"...तर गाझातील युद्धबंदी संपवू अन् पुन्हा लढाई सुरू करू!" बेंजामिन नेतन्याहू यांची हमासला खुली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 02:49 IST2025-02-12T02:48:32+5:302025-02-12T02:49:23+5:30
नेतन्याहू म्हणाले, "जर हमासने शनिवारी दुपारपर्यंत ओलिस असलेले आमचे नागरिक परत केले नाही, तर युद्धबंदी संपेल आणि हमासचा निर्णायक पराभव होईपर्यंत आयडीएफ (इस्रायली सैन्य) तीव्र लढाई पुन्हा सुरू करेल."

"...तर गाझातील युद्धबंदी संपवू अन् पुन्हा लढाई सुरू करू!" बेंजामिन नेतन्याहू यांची हमासला खुली धमकी
हमासने शनिवारी दुपारपर्यंत ओलिसांची सुटका केली नाही, तर इस्रायल गाझामध्ये पुन्हा लष्करी कारवाई सुरू करेल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी (११ फेब्रुवारी) दिला आहे. त्यांनी सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे.
बाठकीनंतर नेतन्याहू म्हणाले, "जर हमासने शनिवारी दुपारपर्यंत ओलिस असलेले आमचे नागरिक परत केले नाही, तर युद्धबंदी संपेल आणि हमासचा निर्णायक पराभव होईपर्यंत आयडीएफ (इस्रायली सैन्य) तीव्र लढाई पुन्हा सुरू करेल." मात्र, ते सर्व ओलिसांच्या सुटकेसंदर्भात बोलत होते की विशिष्ट समूहासंदर्भात, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
तत्पूर्वी, हमासने इस्रायलवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत ओलिसांच्या सुटकेची प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे युद्धबंदी करार अयशस्वी होण्याची शक्यता वाढली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले.
पुन्हा युद्ध भडकणार...?
जर हमासने दिलेल्या मुदतीत बंधकांना अथवा ओलिसांना सोडले नाही तर इस्रायल मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू करू शकतो. मग इस्रायली लष्कराचे (आयडीएफ) उद्दिष्ट हमासचा निर्णायक पराभव करणे असेल. यामुळे गाझामधील युद्ध आणखी तीव्र होऊ शकते. परिणामी प्रादेशिक अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.
सध्यस्थितीत इस्रायली सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. संपूर्ण जगाचे लक्ष शनिवारच्या अंतिम मुदतीकडे लागले आहे. हमासने बंधकांना अथवा ओलिसांना सोडले नाही, तर पुन्हा एकदा भयंकर युद्धाला तोंड फुटू शकते आणि गाझा पुन्हा युद्धभूमी होऊ शकते. यामुळे, गाझामध्ये युद्धबंदी कायम राहणार की पुन्हा लढाई सुरू होणार, हे शनिवारचा दिवसच ठरवेल.