...तर 20 हजार हत्ती तुमच्या देशात पाठवू! शिकारीवर बंदी घालण्यावरून बोत्सवानाचा जर्मनीला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 06:49 AM2024-04-05T06:49:08+5:302024-04-05T06:49:41+5:30
Botswana warns Germany: बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष मोक्ग्वेत्सी मासिसी यांनी जर्मनीला २० हजार हत्ती पाठविण्याची धमकी दिली आहे.
गॅबोरोन - बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष मोक्ग्वेत्सी मासिसी यांनी जर्मनीला २० हजार हत्ती पाठविण्याची धमकी दिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जर्मनीच्या पर्यावरणमंत्र्यांनी हत्तींच्या संवर्धनाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यासाठी बोत्सवानामध्ये हत्तींची शिकार करण्यावर निर्बंध घालायला हवेत, असे त्यांनी म्हटले होते.
ते म्हणाले की, “संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे, बोत्सवानामध्ये हत्तींची संख्या सतत वाढत आहे. ते देशातील पिके नष्ट करत आहेत. लहान मुलांना पायदळी तुडवत आहेत आणि मालमत्तेचे नुकसान करत आहेत. यामुळे आफ्रिकन लोक उपाशी मरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिकार करा, मात्र पैसे द्या
जगातील एकूण हत्तींपैकी एक तृतीयांश हत्ती बोत्सवानामध्ये आहेत. येथे त्यांची संख्या १ लाख ३० हजारांहून अधिक आहे.
विशेषतः जर्मनीतील लोक बोत्सवानासारख्या अनेक आफ्रिकन देशांमध्ये हत्तींची शिकार करण्यासाठी जातात. यासाठी येथील सरकार शिकार करणाऱ्यांकडून हजारो डॉलर्स शुल्क आकारते. हा पैसा लोकांच्या उदरनिर्वाहासाठी वापरला जातो.
ब्रिटनलाही दिली होती धमकी
ब्रिटनमध्ये २०१९ च्या निवडणुकीत हत्तींच्या शिकारीवर बंदी घालण्याचा मुद्दा बनविण्यात आला होता. यावर बोत्सवानाचे वन्यजीव मंत्री मथिम्खुलु यांनी ब्रिटनला धमकी देत म्हटले की, आम्ही लंडनमध्ये १० हजार हत्ती पाठवू.