आण्विक सुरक्षेबाबत मोदींकडून अनेक उपाययोजनांची घोषणा
By admin | Published: April 3, 2016 03:52 AM2016-04-03T03:52:23+5:302016-04-03T03:52:23+5:30
अणुतस्करी टाळण्यासाठी आणि अणुतंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती पडू नये यासाठी तसेच अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील अणुसुरक्षा परिषदेत
वॉशिंग्टन : अणुतस्करी टाळण्यासाठी आणि अणुतंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती पडू नये यासाठी तसेच अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील अणुसुरक्षा परिषदेत भारत सरकारने योजिलेल्या अनेक उपायांची घोषणा केली. या परिषदेत ५० पेक्षा जास्त देशांच्या नेत्यांनी आपले विचार मांडले.
‘आण्विक दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी जागतिक पुढाकार’ या विषयावर २०१७ मध्ये होणारी परिषद भारत आयोजित करणार आहे. त्यानुसार अणुतस्करीच्या मुकाबल्यावर इंटरपोलसह एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याचीही योजना आहे. याशिवाय भारत अणुसुरक्षा कोषात १० लाख अमेरिकी डॉलर देणार आहे.
सौदीत आगमन
अमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी यांचे शनिवारी सौदी अरेबियात आगमन झाले. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. त्यात अनेक द्विपक्षीय करार होणार आहेत.
सामरिक भागीदारी, सुरक्षा मजबूत करणे यावर भर दिला जाणार आहे. त्यांचा हा पहिलाच सौदी दौरा असून रियाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
ओबामांचे भारत-पाकला आवाहन
वॉशिंग्टन : भारत-पाकिस्तान यांनी आपले मार्गक्रमण ‘चुकीच्या दिशेने’होऊ नये यासाठी अण्वस्त्र साठ्यात कपात करावी आणि नवीन लष्करी सिद्धांत विकसित करावा, असे आवाहन अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे.
या दोन देशात प्रगती होणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त अण्वस्त्रे तयार करून हे दोन्ही देश सतत चुकीच्या दिशेने जात आहेत. त्यांनीही अण्वस्त्रात कपात करून नवीन लष्करी सिद्धांत विकसित केला पाहिजे आणि आपली दिशा बदलली पाहिजे, असेही ओबामा म्हणाले. अण्वस्त्र सुरक्षा परिषदेनंतर ते बोलत होते.