‘इथे कुणी राजा नाही..'; ५० राज्यांतील जनता ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यांवर उतरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:29 IST2025-04-21T09:28:43+5:302025-04-21T09:29:07+5:30
लोकशाही आणि कायद्याचे राज्य ट्रम्प यांनी बासनात गुंडाळून राज्य चालवले असल्याचा या लोकांचा आरोप आहे.

‘इथे कुणी राजा नाही..'; ५० राज्यांतील जनता ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यांवर उतरली
वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नव्याने सत्तेत येऊन तीन महिने झाले आहेत; परंतु या काळात नागरिकांच्या हक्कांसंबंधी मुद्यावर धोरणांचे ‘तीनतेरा’ वाजले आहेत. त्यामुळे जनतेचा संताप वाढत चालला आहे. शनिवारी आठवड्यानंतर दुसऱ्यांदा जनता रस्त्यावर उतरली. सर्व ५० राज्यांत लोकांनी हाती आक्रमक बॅनर्स घेऊन ही निदर्शने केली. ट्रम्प यांनी सुरू केलेले ‘टॅरिफ वॉर’, सरकारी नोकरकपात आणि इतर धोरणांचा, हे नागरिक विरोध करीत आहेत. यादरम्यान नागरिकांनी ‘व्हाइट हाउस’ला घेरावही घातला. यापूर्वी दि.५ एप्रिल रोजी नागरिकांनी अशीच देशभर निदर्शने केली होती.
‘५०५००१’ आंदोलन
या आंदोलनास ‘५०५००१’ असे नाव देण्यात आले असून, ५० ठिकाणी एकत्रित विरोधी निदर्शने, ५० राज्य आणि १ आंदोलन, असा याचा अर्थ आहे. लोकशाही आणि कायद्याचे राज्य ट्रम्प यांनी बासनात गुंडाळून राज्य चालवले असल्याचा या लोकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाभियोग चालवा, ट्रम्पना हटवा’ अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
देश आता संकटात
अनेक आंदोलनकर्त्यांनी हाती अमेरिकेचा राष्ट्रीय ध्वज घेत तो उलटा केला. याचा अर्थ असा की, देश आता संकटात आहे. ‘इथे कुणी राजा नाही, अत्याचाराला विरोध करा’ बॅनरमधून राजेशाही संपुष्टात आली आहे, याचे भान लोकांनी सत्ताधाऱ्यांना दिले.