तापमान कमी करण्यासाठी तातडीने करार करण्याची गरज
By admin | Published: December 1, 2015 02:45 AM2015-12-01T02:45:17+5:302015-12-01T08:58:17+5:30
जगाचे वाढते तापमान कमी करण्यासाठी संपूर्ण जगाने तातडीने सर्वसमावेशक, न्याय आणि टिकाऊ करार केला पाहिजे, कारण वाढते तापमान हे जगासमोर मुख्य आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पॅरिस : जगाचे वाढते तापमान कमी करण्यासाठी संपूर्ण जगाने तातडीने सर्वसमावेशक, न्याय आणि टिकाऊ करार केला पाहिजे, कारण वाढते तापमान हे जगासमोर मुख्य आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांनी येथे आयोजित केलेल्या जागतिक हवामान बदलावरील परिषदेसाठी भारताच्या पॅव्हेलियनचे उद््घाटन करताना मोदी यांनी जीवनशैलीत बदल केल्यास पृथ्वीवरील ओझे काहीसे कमी होईल, असे म्हटले. वाढलेले तापमान हे मोठे आव्हान आहे हे खरेच; परंतु ते आम्ही निर्माण केलेले नाही, असे मोदींनी स्पष्ट केले. या परिषदेचे फलित काय हे खूप महत्त्वाचे आहे. जगाने तातडीने कृती करावी, असे आम्हाला वाटते. आमचे प्रयत्न किती टिकाऊ असतील हे आमचे विचार आणि कृती यावर अवलंबून असेल, असेही मोदी म्हणाले. ते म्हणाले, भारताचा विकास ही आमची नियती आणि आमच्या लोकांचा हक्क आहे तरीही आम्ही वाढत्या तापमानाशी लढण्यासाठी पुढे आले पाहिजे. पॅव्हेलियनमधील वेगवेगळ्या स्टॉल्सवर मोदी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह गेले. नंतर त्यांनी पर्यावरण संरक्षणावरील पुस्तकाचे प्रकाशन केले. जागतिक तापमान वाढल्याचा परिणाम हा हवामान बदलात झालेला आहे. तापमान वाढल्याचे वाईट परिणाम म्हणजे शेतकऱ्यांची वाढलेली जोखीम, हवामानाच्या पद्धतीमध्ये झालेले बदल आणि नैसर्गिक संकटांची भीषणता, असे मोदी यांनी निदर्शनास आणून दिले. ही परिषद भारताच्या भवितव्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. विकसित देशांनी या संकटाला तोंड देण्यासाठी गरीब देशांना तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे. या परिषदेच्या समाप्तीनंतर झालेला करार हा मानव व निसर्ग यांच्यात समतोल राखणारा असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘गरजा भागतील एवढी साधने आहेत; हावरटपणा नको, कोणीही निसर्गाच्या पुढे नाही’
मोदी यांनी भाषणात ऋग्वेदातील क्षेत्रपती सुक्त आणि महात्मा गांधींच्या जीवनाचा उल्लेख केला. या जगात प्रत्येकाच्या गरजा भागतील एवढी साधने आहेत; परंतु कोणाचाही हावरटपणा त्यातून पूर्ण होणार नाही, असे गांधी म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या आवडीनिवडींना त्यांची संस्कृती आणि श्रद्धांमुळे आकार मिळतो. भारतात निसर्गाला आईचा दर्जा आहे. फार पुरातन काळापासून आम्ही मानवता हा निसर्गाचाच भाग असल्याचे व निसर्गाच्या वर नसल्याचे बघितले आहे. निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांत पावित्र्य असल्याचे मोदींनी सांगितले.