नॉर्वेचे चालकरहित सागरी जहाज येतेय!
By admin | Published: May 19, 2017 02:10 AM2017-05-19T02:10:41+5:302017-05-19T02:10:41+5:30
पूर्णपणे स्वचलित चालकरहित मोटारीनंतर आता तशाच प्रकारचे कन्टेनर वाहतुकीचे प्रचंड आकाराचे चालकरहीत सागरी जहाज बांधण्याची तयारी सुरु झाली असून सर्व काही
लंडन: पूर्णपणे स्वचलित चालकरहित मोटारीनंतर आता तशाच प्रकारचे कन्टेनर वाहतुकीचे प्रचंड आकाराचे चालकरहीत सागरी जहाज बांधण्याची तयारी सुरु झाली असून सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडले तर असे पहिले जहाज सन २०२० मध्ये पहिल्या सफरीवर रवाना होण्याची शक्यता आहे.
काँग्सबर्ग ग्रुप्पेन एएसए ही नॉर्वेमधील एक सागरी तंत्रज्ञान कंपनी आणि यारा एएसए या रासायनिक उत्पादक कंपनीने भागिदारीत असे जहाज बांधण्याची योजना गेल्या आठवड्यात जाहीर केली. ‘यारा बिर्कलॅण्ड’ नावाचे हे जहाच पुढील वर्षी बांधून तयार होणार असले तरी सुरुवातीची दोन वर्षे इतर जहाजांप्रमाणे त्याचे संचालन कर्मचारी करतील. त्यावर बसविलेली संपूर्ण स्वचलित यंत्रणा पूर्णांशाने निर्धोक आहे याची खात्री झाली की हे जहाज सन २०२० मध्ये पहिल्या चालकरहीत शपरीवर रवाना होईल. अशा प्रकारच्या स्वचलित सागरी जहाजांच्या किफायतशीरपणाचे आर्थिक गणित फार पूर्वीपासूनच पटलेले आहे. एका सल्लागार कंपनीने काढलेल्या गणितानुसार जहाजाच्या परिचालन खर्चाचा ४४ टक्के हिस्सा कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या खर्चाचा असतो. हा केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणाऱ्या खर्चाचा प्रश्न नाही. कर्मचारी कित्येक महिन्यांच्या सागरी प्रवासात जहाजावरच राहात असल्याने त्यांच्या निवासाची व अन्य गरजांची सोय करावी लागते. कर्मचारीच नसले की एरवी त्यांच्यासाठी लागमारी जहाजावरील जागा मालासाठी वापरता येऊ शकते. साहजिकच जहाज कर्मचाऱ्यांच्या जागतिक संघटनेने अशा प्रकारच्या जहाजांना विरोध केला असून कुशल दर्यावर्दी नाविकांची जागा तंत्रज्ञान कितपत घेऊ शकेल यावर शंका घेतली आहे. पण काल-परवापर्यंत जे अशक्य वाटत होते ते आता प्रत्यक्षात उतरत आहे.