मॉस्कोपासून मुंबई-पुण्याएवढ्या अंतरावर होते हजारोंचे सैन्य; पुतीनविरोधी बंड अचानक कसे शमले?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 10:19 AM2023-06-25T10:19:34+5:302023-06-25T10:19:57+5:30
वॅगनर ग्रुपचा सर्वेसर्वा आणि एकेकाळचा पुतीन यांचा कुक येवगेनी प्रिगोझिनीने माघार घेतल्याची घोषणा केली. आपले सैन्य मॉस्कोकडे नाही तर आता बेलारूसमधील लष्करी तळांवर जाणार असल्याचे त्याने सांगितले.
शनिवारची सकाळ रशियासाठी मोठी खळबळजनक सकाळ झाली होती. जगातील दुसऱ्या क्रमांकाची प्रायव्हेट आर्मी रशियाविरोधात उभी ठाकली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सत्तेतून हुसकावून देण्याची भीती वाटली होती. यामुळे मॉस्कोमध्ये लष्करी वाहने, रणगाड्यांची वर्दळ कमालीची वाढली होती. वॅगनर या पॅरामिलिट्री ग्रुपने मॉस्कोपासून जवळपास २०० किमीपर्यंत मजल मारली असताना अचानक हे बंड मागे घेतल्याची घोषणा झाली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
वॅगनर ग्रुपचा सर्वेसर्वा आणि एकेकाळचा पुतीन यांचा कुक येवगेनी प्रिगोझिनीने माघार घेतल्याची घोषणा केली. आपले सैन्य मॉस्कोकडे नाही तर आता बेलारूसमधील लष्करी तळांवर जाणार असल्याचे त्याने सांगितले. क्रेमलिनकडून देखील तशी घोषणा केली गेली. यामध्ये खरी मध्यस्थी केली ती बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांनी.
एका शांतीकरारानुसार हा सशस्त्र उठाव थांबविण्यात अलेक्झांडर यांना यश आले. शनिवारी सायंकाळपर्यंत प्रिगोझिनीचे सूर बदलले आणि त्याने रक्तपात वाचविण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. प्रिगोझिनीवरील सर्व फौजदारी खटले मागे घेतले जाणार आहेत. त्याच्या सैनिकांवरही कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाहीय. वॅगनरचे सैनिक रशियाच्या संरक्षण मंत्रालयाशी करार करतील, असे रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले.
शनिवारी जे घडले ते पुतिनसाठी खरोखरच एक मोठा इशारा होता. वॅगनरने रशियन सैन्याचे मुख्यालय असलेले शहर रोस्तोव्ह ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना राष्ट्राला संबोधित करावे लागले. पुतिन यांनी या आणीबाणीच्या संदेशात म्हटले की वॅगनरने जे केले तो देशद्रोह होता.