...तर संस्कृत श्लोकावरुन भारतात गदारोळ झाला असता - मोदी
By admin | Published: September 23, 2015 08:34 PM2015-09-23T20:34:11+5:302015-09-23T20:34:11+5:30
आयर्लंडमधील विद्यार्थी संस्कृतमध्ये श्लोक सादर करुन स्वागत करतात. पण भारतात असा प्रकार घडला असता तर धर्मनिरपेक्षतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते असा टोला मोदींनी लगावला आहे.
ऑनलाइन लोकमत
डब्लिन, दि. २३ - आयर्लंडमधील विद्यार्थी संस्कृतमध्ये श्लोक सादर करुन पंतप्रधानांचे स्वागत करतात, आयर्लंडमध्ये हे शक्य आहे. पण भारतात असा प्रकार घडला असता तर धर्मनिरपेक्षतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आयर्लंड दौ-यावर असून बुधवारी मोदींनी डब्लिन येथे आयर्लंडमधील भारतीयांना संबोधित केले. या कार्यक्रमात आयर्लंडमधील विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये श्लोक सादर करत मोदींचे स्वागत केले. याचा संदर्भ देत भाषणा दरम्यान मोदींनी विरोधकांना टोला लगावला. आयर्लंडमधील विद्यार्थी संस्कृत श्लोक सादर करुन स्वागत करतात ही चांगली गोष्ट आहे. ही मुलं हे श्लोक नुसती पाठ करुन आल्याचे मला वाटत नाही. पण भारतात असा प्रकार झाला असता तर धर्मनिरपक्षतेवर प्रश्न उपस्थित झाले असते असे मोदींनी सांगितले. ६० वर्षानंतर भारतीय पंतप्रधान आयर्लंडमध्ये आले असून आता पुन्हा असं होणार नाही असे आश्वासन देत मोदींनी आयलर्डंमधील भारतीयांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. सध्या जगभरात भारताच्या विकासाची चर्चा आहे. आता एकाही भारतीयाला शरमेने मान खाली घालण्याची गरज राहिलेली नाही असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मोदींच्या विधानावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. परदेश दौ-यात मोदींनी अशा प्रकारचे विधान करणे अयोग्य असल्याचे काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी सांगितले.