'ही माणसं नाहीत, जनावरं आहेत'; डोनल्ड ट्रम्प बरळले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 05:58 PM2018-05-17T17:58:17+5:302018-05-17T18:09:52+5:30
डोनल्ड ट्रम्प यांनी आपल्याच देशाच्या कायद्यांबद्दल आणि स्थलांतरितांवर राग व्यक्त केला आहे.
वॉशिंग्टन- स्थलांतर करुन अमेरिकेत येणाऱ्या लोकांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प नेहमीच दुस्वास करतात हे आता लपून राहिलेले नाही. सत्तेत येताच त्यांनी सहा देशातल्या नागरिकांवर अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. सीरिया आणि जगातील इतर प्रश्नांनंतर तसेच मेक्सिकोमार्गे अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतर सुरुच आहे. ट्रम्प यांनी या स्थलांतरितांबद्दल नेहमीच असहिष्णू भाव दाखवत त्यांना कडाडून विरोध केला आहे. आता तर या लोकांची त्यांना जनावरं म्हणून संभावना केली आहे.
अमेरिकेचे इमिग्रेशन कायदे कठोर नाहीत असे सांगत त्यांनी अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणावर कडाडून टीका केली आहे. हे कायदे मूर्खपणाचे आहेत असे सांगत केवळ मेरिटच्या जोरावरच लोकांना अमेरिकेत प्रवेश मिळाला पाहिजे असा शब्दांमध्ये त्यांनी आपला राग व्यक्त केला. याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, "आपल्या देशात भरपूर लोक येत आहेत आणखी येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना थांबविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण तुम्ही कल्पना करु शकणार नाही इतके हे लोक वाईट आहेत. हे लोक नाहीत तर जनावरं आहेत'' अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी स्थलांतरितांबद्दल अनुद्गार काढले.
या बेकायदेशीर स्थलांतरितांना माघारी पाठविण्याचं प्रमाण आजवर इतकं कधीच नव्हतं. हे सगळं दुबळ्या कायद्यांमुळे होत आहे. ते वेगाने अमेरिकेत येतात, आम्ही त्यांना पकडतो आणि परत पाठवतो. परत ते अमेरिकेत येतात, परत आम्ही त्यांना माघारी पाठवतो हे सगळं विचित्र आहे असे ट्रम्प यांनी मत मांडले. अमेरिका आणि मेक्सिको यांच्या सीमेवरील बेकायदा स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची ट्रम्प यांनी काँग्रेसला अनेकदा विनंती केली आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्याबद्दल बोलताना ते म्हणाले, आधी सांगितल्याप्रमाणे हे कायदे अत्यंत मूर्खपणाचे आहेत. जगातील सर्वात जास्त मूर्ख कायदे आहेत. आमची अर्थव्यवस्था चांगली असल्यामुळे लोक इथे येतात आणि त्यातल्या प्रत्येकाला या अर्थव्यवस्थेतील वाटा हवा आहे पण त्यामुळे रोजगार मिळणं कठिण होत जातं. त्यामुऴे या देशात लोक केवळ मेरिटच्या जोरावर आले पाहिजेत. मेरिट असणाऱ्या लोकांची आम्हाला गरजच आहे.