भारतीयांसाठी अमेरिकेचा मोठा निर्णय! VISA साठी वैयक्तिक मुलाखतीतून दिली सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 04:29 PM2022-02-27T16:29:50+5:302022-02-27T16:30:29+5:30
No In-person interview for US Visa: अमेरिकेनं विद्यार्थी आणि कामगारांसह अनेक व्हिसा (VISA) अर्जदारांना या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत भारतातील दूतावासांमध्ये मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अट शिथिल केली आहे.
No In-person interview for US Visa: अमेरिकेनं विद्यार्थी आणि कामगारांसह अनेक व्हिसा (VISA) अर्जदारांना या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत भारतातील दूतावासांमध्ये मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अट शिथिल केली आहे. त्यामुळे व्हिसा प्राप्तीसाठी आता वैयक्तिक मुलाखत देण्याची गरज नाही. अमेरिकेच्या एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांनी भारतीय समुदायाच्या नेत्यांना ही माहिती दिली आहे. सूट मिळालेल्या अर्जदारांमध्ये विद्यार्थी (F, M आणि शैक्षणिक J व्हिसा), कामगार (H-1, H-2, H-3 आणि वैयक्तिक L व्हिसा), संस्कृती आणि अपवादात्मक क्षमता असलेले लोक (O, P आणि Q व्हिसा) यांचा समावेश आहे.
व्हिसा अर्जदारांना अशी सुविधा देणं खूप गरजेचं होतं. आमचे मित्र आणि जवळच्या कुटुंबातील सदस्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल आणि त्यांच्या अनेक चिंता आणि गैरसोयी दूर होतील, असं दक्षिण आशियाई समुदायाचे नेते आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे आशियाई अमेरिकन सल्लागार अजय जैन भुटोरिया यांनी दक्षिण मध्य आशियाचे सहाय्यक परराष्ट्र सचिव डोनाल लू यांच्या भेटीनंतर सांगितले.
20 हजारांहून अधिक नियुक्त्या जारी
नवी दिल्लीतील यूएस दूतावासाच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या सूचनेनुसार, नवी दिल्लीतील यूएस दूतावास आणि त्याचे चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई येथील वाणिज्य दूतावास पात्र अर्जदारांना मुलाखतीत सूट देण्यासाठी २०२२ या वर्षात २० हजाराहून अधिक 'अतिरिक्त सलवत (ड्रॉपबॉक्स) अपॉइंटमेंट्स' जारी करणार आहे.