‘ते’ हल्लेखाेर एनआयएच्या रडारवर; सॅनफ्रॅन्सिस्कोच्या भारतीय दूतावासावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 10:30 AM2023-09-22T10:30:14+5:302023-09-22T10:30:34+5:30
सॅनफ्रॅन्सिस्कोच्या भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा अमेरिकी लोकप्रतिनिधींनी निषेध केला होता, मात्र कॅॅनडाने खलिस्तानवाद्यांच्या कारवायांना अजिबात विरोध केला नाही.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथील भारतीय दूतावासावर हल्ला करणाऱ्या खलिस्तानवाद्यांपैकी दहा संशयित आरोपींची छायाचित्रे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जारी केली आहेत. या लोकांची माहिती तपास यंत्रणेने जनतेकडून मागविली आहे.
खलिस्तानवाद्यांच्या मुद्यावरून भारतानेकॅनडाबाबत अतिशय कणखर भूमिका घेतली असतानाच एनआयएने आता सॅनफ्रॅन्सिस्को प्रकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. सॅनफ्रॅन्सिस्को येथील भारतीय दूतावासावर १९ मार्च व त्यानंतर २ जुलै रोजी देखील हल्ला झाला होता. त्यावेळी दूतावासाच्या इमारतीची नासधूस करण्यात आली होती. या हल्लेखोरांपैकी १० जणांची माहिती एनआयएने जनतेकडून मागविली आहे. त्यांना अटकही हाेऊ शकते.
कॅनडाने केला नव्हता विराेध
सॅनफ्रॅन्सिस्कोच्या भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा अमेरिकी लोकप्रतिनिधींनी निषेध केला होता, मात्र कॅॅनडाने खलिस्तानवाद्यांच्या कारवायांना अजिबात विरोध केला नाही. मात्र, एनआयएने ज्या दहा आरोपींची छायाचित्रे जारी केली, ते लोक १९ मार्च रोजी सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये भारतीय दूतावासाच्या हल्ल्याशी निगडीत आहेत. त्यावेळी हा दूतावास जाळण्याचा हल्लेखोरांनी प्रयत्न केला हाेता.