सर्वसामान्यांना ते आपले वाटलेच नाहीत; भारताचे जावई ब्रिटनमध्ये नेमके का हरले?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 07:51 AM2024-07-06T07:51:19+5:302024-07-06T07:51:42+5:30

सुनक कुटुंब राजापेक्षा श्रीमंत; भारतीयांनीही नाकारले; महागाईचाही फटका

They did not belong to the common people; Why exactly did India son-in-law Rishi Sunak lose in Britain? | सर्वसामान्यांना ते आपले वाटलेच नाहीत; भारताचे जावई ब्रिटनमध्ये नेमके का हरले?

सर्वसामान्यांना ते आपले वाटलेच नाहीत; भारताचे जावई ब्रिटनमध्ये नेमके का हरले?

लंडन - ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या हुजूर  पक्षाला (कंझर्व्हेटिव्ह) दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. मजूर पक्षाचे (लेबर पार्टी) कीर स्टार्मर नवे पंतप्रधान झाले आहेत. सुनक यांच्या पराभवामागे अनेक कारणांपैकी म्हणजे त्यांची गडगंज संपत्ती असल्याचे मानले जाते.

ऋषी सुनक यांना २५ ऑक्टोबर २०२२ रोजी ब्रिटनचे पंतप्रधानपद मिळाले. वास्तविक त्यांच्या हुजूर पक्षात अंतर्गत कलह सुरू होता. अवघ्या चार महिन्यांत बोरिस जॉन्सन आणि लिझ ट्रस या दोन पंतप्रधानांना बदलावे लागले.  त्यांच्याच पक्षाचे सदस्य आरोप करायचे की, सुनक हे इतके श्रीमंत आहेत की त्यांचा सर्वसामान्यांशी काहीही संबंध नाही. सर्वसामान्यांनाही त्यांच्याशी आपलेपणा वाटत नाही.

सुनक प्रवासासाठी खासगी जेट वापरत, कोरोनात सुनक २० हजार रुपयांच्या कॉफी मगसोबत दिसले होते. २०२२ मध्ये आठवडाभरात त्यांनी खासगी जेटने प्रवास करण्यासाठी सरकारी तिजोरीतून ५ कोटी रुपये खर्च केले. त्यांच्या पत्नीवरही करचुकवेगिरीचा आरोप होता.

६५ टक्के भारतीय होते नाराज 
ब्रिटनमध्ये सध्या १८ लाख भारतीय वंशाचे मतदार आहेत. यातील ६५ टक्के लोक सुनक सरकारवर नाराज होते. सुनक पंतप्रधान झाल्यानंतर या भारतीय वंशाच्या लोकांना एक आशा होती, पण सुनक यांच्याकडून त्यांचा अपेक्षाभंग झाला. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटिश-भारतीय समुदायामध्ये खूप प्रसिद्ध होते. पण असे असूनही ब्रिटिश-भारतीय समाजाने त्याला साथ दिली नाही. बहुतांश ब्रिटिश भारतीय मतदारांनी सुनक यांना पंतप्रधान म्हणून निवडण्याऐवजी बदलाला मतदान केले.

संपत्ती ६,८६७ कोटी रुपये; सर्वात श्रीमंत खासदार
सुनक हे ब्रिटनचे सर्वात श्रीमंत खासदार मानले जातात. त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांना ब्रिटनच्या बिल गेट्स म्हणतात. त्या ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत महिला आहे. त्यांच्याकडे इन्फोसिसचे शेअर्स आहेत. यामुळे, सुनक कुटुंब २०२२ मध्ये मूल्यांकनाच्या बाबतीत ब्रिटनच्या दिवंगत राणीपेक्षा अधिक श्रीमंत होते. ब्रिटिश वृत्तपत्र संडे टाइम्सच्या वृत्तानुसार, सुनक कुटुंब ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. सुनक कुटुंबाची संपत्ती ६५१ दशलक्ष पौंड (६,८६७ कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, राजा चार्ल्सची संपत्ती ६१ कोटी पौंड आहे.

आली दिवाळीची आठवण
सुनक यांनी भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान म्हणून डाऊनिंग स्ट्रीट (ब्रिटिश पंतप्रधानांचे निवासस्थान) येथे आपल्या कुटुंबासोबत साजरी केलेल्या दिवाळीच्या आठवणी सांगितल्या.  निरोपाच्या भाषणात ते भावुक झाले. त्यांनी मतदारांची माफी मागितली. 

पराभवाची कारणे काय?
ब्रिटनची ढासळलेली आर्थिक स्थिती आणि महागाई कमी करण्याचे आश्वासन सुनक पूर्ण करू शकले नाही. 
सुनक सरकारने अनेक प्रकारचे कर वाढवले होते. त्यामुळे जनतेवर ताण पडला.
मजूर पक्षाने नवीन घरे बांधण्यासाठी गृहनिर्माण धोरण आणले, जे लोकांनी स्वीकारले. 
सुनक सरकारला गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी घटना रोखण्यात अपयश.
ब्रेक्झिट कराराचा ब्रिटनला फारसा फायदा झाला नाही
अवैध स्थलांतराची समस्या कायम.

असा बसला फटका...
येथे महागाई आणि बेरोजगारी ही मोठी समस्या होती. जनतेचा मोठा वर्ग आर्थिकदृष्ट्या त्रस्त असून उदरनिर्वाहासाठी संघर्ष करीत असताना सुनक यांची श्रीमंत इमेज त्याच्या विरोधात गेली. सरकारमध्ये राजीनाम्यांचा महापूर आला होता. वर्षभरात ३ मंत्री आणि ७८ खासदारांनी राजीनामे दिले होते.

Web Title: They did not belong to the common people; Why exactly did India son-in-law Rishi Sunak lose in Britain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.