"त्यांना गद्दारीची शिक्षा मिळाली!’’, वंगबंधूंचा पुतळा पाडल्याबद्दल पाकिस्तानने व्यक्त केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 04:34 PM2024-08-06T16:34:49+5:302024-08-06T16:42:03+5:30
Bangladesh Protests: शेख हसीना यांनी बांगलादेशचं पंतप्रधानपद सोडल्यानंतर आंदोलकांनी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजिबूर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. आता या घडामोडींबाबत पाकिस्तानमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शेख हसीना यांना बांगलादेशचं पंतप्रधानपद सोडावं लागलं होतं. दरम्यान, शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून सध्या भारतात आश्रय घेतला आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशचं पंतप्रधानपद सोडल्यानंतर आंदोलकांनी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजिबूर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. आता या घडामोडींबाबत पाकिस्तानमधून आनंद व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी अब्दुल बासित यांनी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनाचं स्वागत केलं आहे. शेख हसीना यांनी सत्तेमधून पायउतार होणं हे पाकिस्तान आणि या भागासाठी चांगले संकेत आहेत. शेख हसीना ह्या पाकिस्तानचा द्वेष करायच्या, तसेच त्या भारताच्या हातचं खेळणं बनल्या होत्या, असा आरोप बासित यांनी केला. तसेच शेख मुजिबूर रहमान यांचा पुतळा तोडल्या बद्दल आनंदही व्यक्त केला.
बांगलादेशमध्ये घडत असलेल्या घडामोडींबाबत अब्दुल बासित हे सातत्याने यूट्यूबवरून आपलं मत मांडत आहेत. एका व्हिडिओमध्ये अब्दुल बासित यांनी शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याबद्दल बांगलादेशमधील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. जर हसीना यांनी एक महिना आधी राजीनामा दिला असता तर ३०० लोकांचा जीव गेला नसता अशी टीकाही त्यांनी केली.
याच व्हिडिओमधून बासित यांनी शेख हसीना यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, शेख हसीना यांनी बांगलादेशला भारताचे सॅटेलाईट राष्ट्र बनवलं होतं. त्यांच्या मनात पाकिस्तानबाबत द्वेष होता. त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले होते, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, आणखी एका व्हिडिओमधून अब्दुल बासित यांनी शेख मुजिबूर रहमान यांचा पुतळा तोडल्या बद्दल आनंद व्यक्त केला. ज्यांनी पाकिस्तानसोबत गद्दारी केली, त्याचा काय परिणाम झाला हे आपण काल पाहिले. ज्या प्रकारे शेख मुजिबूर रहमान यांचा पुतळा पाडण्यात आला, त्यामधून सद्दाम हुसेन याच्या तोडलेल्या पुतळ्याची आठवण आली. तसेच त्यांची कन्या शेख हसीना यांनाही बंगलादेशमधून पलायन करावं लागलं