'ते' 13 जण, 90 कमांडो अन् 432 तासांचा थरार... थायलंडमधील 'रेस्क्यू ऑपरेशन'ची 'अंदर की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 12:06 PM2018-07-11T12:06:59+5:302018-07-11T12:10:45+5:30
उत्तरी थायलंडच्या थाम लुआंग या गुहेत हे 13 जण पोहचले. मात्र, मुसळधार पावसामुळे गुहेतून बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हते.
माए साई - थायलंडचा अंडर 16 फुटबॉल संघ आणि त्यांचे प्रशिक्षक 23 जून रोजी एका गुहेत अडकले. फुटबॉलच्या सरावानंतर उत्तरी थायलंडच्या थाम लुआंग या गुहेत हे 13 जण पोहचले. मात्र, मुसळधार पावसामुळे गुहेतून बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे पाण्यापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी या 13 जणांनी गुहेमध्ये 4 किमी आत प्रवेश केला. माध्यमांमध्ये ही बातमी पसरताच थायलंडने मिशन सेव्ह चाईल्स सुरु केले. पण, अतिशय कठिण ठरणाऱ्या या मोहिमेला फत्ते करण्यासाठी संपूर्ण जग एकवटले. तब्बल 432 तासांच्या थरारक ऑपरेशननंतर हे मिशन यशस्वी झाले. दुर्दैवाने ही मोहिम फत्ते करताना एका नेव्ही अधिकाऱ्याला वीरमरण प्राप्त झाले.
थाम लुआंग येथील अडकलेल्या फुटबॉल संघाची बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरली. त्यामुळे, 2 जुलै रोजी साऊथ अँड मिड वेल्स केव्ह रेस्क्यू टीमचे सदस्य व ब्रिटीश डायव्हर्स (रेस्कू टीमचे कमांडो) रिचर्ड स्टैनन आणि जॉन वॉलैनथन यांनी गुहेतील मुलांना शोधून काढले. गेल्या अनेक दिवसांपासून पोटात अन्न नसल्याने सर्वच मुले अशक्त झाली होती. मात्र, डायव्हर्संना पाहून या मुलांच्या जीवात जीव आला.
गुहेतील पाण्याची स्थिती पाहून सर्वप्रथम या मुलांना पावसाळा संपेपर्यंत गुहेतच राहावे लागेल, असे सांगण्यात आले. पण, गुहेत वाढणारा पाण्याचा जोर आणि कार्बनडय ऑक्साईडचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन, तसे झाल्यास सर्वच मुले मृत्यूमुखी पडण्याची भीती होती. त्यामुळे 8 जुलै रोजी बचाव पथकाने 'करो या मरो' मोहीम हाती घेतली. आपल्या जीवाची बाजी लावून जगभरातील 90 डायव्हर्संने या गुहेत प्रवेश केला. त्यामध्ये थायलंडचे 40 तर इतर देशांतील 50 जणांचा सहभाग होता. मुलांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना ऑक्सीजन टॅँक आणि डाईव्ह मास्क देण्यात आले होते. या गुहेतील एका ठिकाणी रेस्क्यू टीमने आपला सुरक्षित चेंबर 3 म्हणजे एक बेस तयार केला होता. सुरुवातीला या सर्वांना सुरक्षित चेंबर 3 वर आणण्यात आले. तेथे काही काळ आराम केल्यानंतर 12 मुलांसह त्यांच्या प्रशिक्षकांना गुहेतून बाहेर काढले गेले. मुलांनी गुहेतून बाहेर येताच गुहेबाहेर अश्रूंचा बाध फुटला. मुसळधार पावसातही आई-वडिलांच्या डोळ्यांतून निघणारे अश्रू स्पष्ट दिसते होते. आपल्या जीवाची पर्वा न करता 90 बहाद्दर डायव्हर्सने आपले मिशन पूर्ण केले होते. रेस्क्यू पथकातील प्रत्येक डायव्हर्सच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद झळकत होता. मात्र, या मिशनमध्ये 6 जुलै रोजी 38 वर्षीय माजी थायलंडचे माजी नेव्ही सील कमांडर समन गुनान यांना गुहेत वीरमरण प्राप्त झाले होते. आपल्या देशातील फुटबॉलचं भवितव्य वाचवण्यासाठी या कमांडोने आपला जीव गमावला.
या रेस्क्स्यू ऑपरेशनच्या प्रमुखांनी या टीमला संयुक्त राष्ट्र टीम असे नाव दिले होते. एका देशावरील संकटाचा सामना जगातील सर्वच देशांकडून करण्यात येत असल्याचे यातून दिसले. या मोहिमेत यूके, चीन, म्यानमार, लाओस, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जापान आणि इतर देशांमधील डायव्हर्संचा सहभाग होता. तर, भारताली सांगलीच्या प्रसाद कुलकर्णी यांच्या टीमनेही या मोहिमेत महत्त्वाजी भूमिका बजावली. दरम्यान, मंगळवारी Thai cave rescue या शब्दाने गुगलवर 35.90 कोटी नेटिझन्सने सर्च केले. यावरुन जगभरातील नागरिक या घटनेबाबत किती जागरुक होते आणि या मुलांची चिंता जगभरातील लोकांना लागली असल्याचे दिसून येते.