'ते' विमान जाणूनबुजून पाडण्यात आले - फ्रान्सचा दावा
By admin | Published: March 26, 2015 07:15 PM2015-03-26T19:15:07+5:302015-03-26T19:43:21+5:30
फ्रान्समधील आल्प्स पर्वतरांगेत कोसळलेल्या जर्मन विंग्सच्या विमान अपघाताला आता नवीन वळण मिळाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. २६ - फ्रान्समधील आल्प्स पर्वतरांगेत कोसळलेल्या जर्मन विंग्स विमानाच्या तपासात आता नवीन वळण मिळाले आहे. विमानाच्या सह वैमानिकाने जाणूनबुजून विमान खाली आणले व त्यामुळेच हा अपघात झाला असा दावा या अपघाताचा तपास करणा-या फ्रेंच अधिका-याने केला आहे. त्यामुळे हा विमान अपघात आहे की पूर्वनियोजित कट होता असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी आल्प्स पर्वतरांगेत जर्मन विंग्स या कंपनीचे एअरबस ए ३२० हे विमान कोसळले. या अपघातात विमानातील १५० जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताचा तपास करणा-या फ्रान्समधील तपास यंत्रणेचे अधिकारी ब्राइस रॉबिन म्हणाले, विमान कोसळण्याच्या काही वेळापूर्वी मुख्य वैमानिक शौचालयात गेला होता व यानंतर तो कॉकपिटमध्ये परतलाच नाही. सह वैमानिकाने कॉकपिट आतून बंद करुन घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा सर्व खुलासा विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड झालेल्या संभाषणातून झाला आहे असेही रॉबिन यांनी स्पष्ट केले. विमान कोसळण्याच्या काही मिनीटांपूर्वी कॉकपिटमध्ये भयाण शांतता होती. मुख्य वैमानिक बाहेर गेल्यावर सहवैमानिक काहीच बोलला नाही असे समोर आले आहे.
अपघातापूर्वी विमान अवघ्या ८ मिनीटांमध्ये ३२ हजार फुटांनी खाली आले होते. त्यामुळे या सर्व घटनेवर आधीपासूनच संशय व्यक्त होत होता. आता फ्रान्सच्या अधिका-यांनी विमान अपघात नसून घातपात असल्याचे संकेत दिले आहेत. सह वैमानिकाचे नाव आंद्रेस लुबित्झ असे असून त्याला मानसिक आजार असल्याचे कधीही जाणवले नाही असे लुबित्झच्या मित्रमंडळीचे म्हणणे आहे.