काही क्षणांत ३२ वर्षांची मेहनत मातीमोल
By admin | Published: May 1, 2015 02:39 AM2015-05-01T02:39:12+5:302015-05-01T02:39:12+5:30
३२ वर्षांच्या मेहनतीतून निर्माण केलेली स्वत:ची पाच मजली इमारत डोळ्यांदेखत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना हतबल होऊन पाहण्याशिवाय त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता.
काठमांडू : ३२ वर्षांच्या मेहनतीतून निर्माण केलेली स्वत:ची पाच मजली इमारत डोळ्यांदेखत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना हतबल होऊन पाहण्याशिवाय त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता. ही व्यथा आहे, मूळ राजस्थानी जैन कुटुंबातील असलेल्या आणि सध्या काठमांडूमध्ये स्थायिक झालेल्या प्रकाश दुग्गर यांची. या घटनेत त्यांच्या ४ कर्मचाऱ्यांचा जीव देखील गेला. दुग्गर यांनी काठमांडूमध्ये जम बसविला. पण भूकंप झाला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.
भूकंपानंतर आता त्यांच्याकडे कामाला असलेले सगळे कर्मचारी सध्या तात्पुरत्या तंबूंमध्ये वास्तव्याला आहेत. संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाल्यानंतरही कोणीही मदतीला न आल्याची खंत दुग्गर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
झोपणे, म्हणजे ‘धाडस’
रात्र-रात्र जागून काढणे नेपाळमध्ये आता नित्याचेच बनले आहे. शनिवारच्या भूकंपानंतर आतापर्यंत तब्बल ६०० आफ्टर शॉक्सची नोंद भूकंपमापन यंत्रावर झाली आहे. त्यातील सुमारे १०० भूकंपाचे धक्के सगळ्याच नेपाळी नागरिकांनी अनुभवले आहेत. त्यातून निर्माण झालेल्या भीतीने सगळ्यांनाच ग्रासले आहे. पुन्हा एखादा मोठा धक्का बसेल आणि सगळेच संपेल, अशी भीती साऱ्यांना आहे.