पाणी प्या आणि बाटली खाऊन टाका!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 09:51 AM2022-12-21T09:51:52+5:302022-12-21T09:52:12+5:30
आईबाबांबरोबर समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणं ही तिची आवडती गोष्ट. पण समुद्रकिनाऱ्यावर पडलेल्या प्लॉस्टिकच्या बाटल्या बघून तिला फार काळजी वाटायची....
ती फक्त १२ वर्षांची आहे. आईबाबांबरोबर समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणं ही तिची आवडती गोष्ट. पण समुद्रकिनाऱ्यावर पडलेल्या प्लॉस्टिकच्या बाटल्या बघून तिला फार काळजी वाटायची. यावर काहीच पर्याय नसेल का, हा विचार तिला त्रास द्यायचा. हा प्लास्टिकचा कचरा कमी कसा करता येईल याचं उत्तर स्वत: शोधण्याच्या प्रयत्नातून तिने एक प्रयोग केला. या प्रयोगाला शालेय विज्ञान प्रदर्शनात बक्षीस मिळालंच आणि आता तिच्या या प्रयोगाची निवड अमेरिकेतील २०२२ ब्राॅडकाॅम मास्टर्स काॅम्पिटिशन या सायन्स, टेक्नाॅलाॅजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ अर्थात स्टेम स्पर्धेसाठीच्या अंतिम ३० जणांच्या यादीत झाली आहे. या मुलीचं नाव आहे मॅडिसन चेकेट्स. ती अमेरिकेतल्या उटाह येथील इगल माउण्टेन या शहरात राहाते. ‘ खाता येणारी पाण्याची बाटली ‘ या तिच्या प्रयोगासाठी सातवीत असलेल्या चेकेट्सचं जगभर कौतुक होत आहे.
पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांची निर्मितीच मुळी वापरा आणि फेकून द्या या संकल्पनेवर झाली आहे. त्यामुळे वापरुन झाल्यावर या बाटल्या केवळ कचरा म्हणून पडून राहतात. एकट्या अमेरिकेत दरवर्षी साधारणत: ३० अब्ज पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या वापरल्या जातात. त्यातील बहुतांश बाटल्यांचा पुनर्वापर शक्य नसल्याने त्या फेकल्या जातात. यामुळे समुद्राचं पर्यावरण धोक्यात आलं आहे, हे चेकेटसला माहिती होतं.
प्लास्टिकच्या बाटल्यांच्या कचऱ्यावर काय उपाय ? या प्रश्नाचं आपल्या पातळीवर उत्तर शोधण्यासाठी चेकेट्स प्रयत्न करत होती, तिची इंटरनेटवर शोधाशोध सुरु होती. या शोधादरम्यान ‘ रिव्हर्स स्पेरिफिकेशन ‘ या संकल्पनेवर ती थबकली. जेलीसदृश चिकट आवरणात द्रव पदार्थ साचण्याच्या या प्रक्रियेतूनच तिला खाता येऊ शकणाऱ्या पिण्याच्या बाटलीचा शोध लागला. रिव्हर्स स्पेरिफिकेशन हे पाककलेतलं तंत्र २००५ मध्ये ‘ एल बुली ‘ या रेस्टाॅरंटमधील शेफ, संशोधक यांनी जगभरात लोकप्रिय केलं. या तंत्राचं मूळ १९४० मधल्या स्पेरिफिकेशन या पाककलेतल्या मूळ तंत्रात सापडलं. हे तंत्र ‘ पाॅपिंग बोबा ‘ या बुडबुडेसदृश चहा या पेयात वापरलं गेलं. यात द्रावणाचे अर्ध घन स्वरुपात रुपांतर होतं. स्पेरिफिकेशनच्या तुलनेत रिव्हर्स स्पेरिफिकेशन या तंत्रात चिकट जेलीय आवरणात द्रव पदार्थ जास्त काळ साठवून ठेवला जातो. या आवरणाचा आकारही मोठा असतो. चेकेट्सने इंटरनेटवर बघितलेल्या या तंत्रावर आधारित प्रयोग करायचं ठरवलं.
पदार्थात टाकले जाणारे दोन घटक एकत्र आल्यावर त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते, यावर तिचा खाता येणाऱ्या पाण्याच्या बाटलीचा प्रयोग आधारलेला आहे. कॅल्शियम लॅक्टेट आणि सोडियम हे एकत्र करुन फिरविल्यावर चिकट स्वरुपाचा जेलीय पडदा तयार होतो. या पडद्याच्या आवरणात द्रव पदार्थ धरुन ठेवता येतो. या निष्कर्षाचा आधार घेत चेकेट्स प्रयोग करत राहिली. त्यात चुका झाल्या. तिने त्यात पुन्हा बदल केले. असं अनेकवेळा झाल्यानंतर तिनं एक नमुना तयार केला. यात तिनं कॅल्शियम लॅक्टेट, एक्सॅनथन गम, लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करुन ते मिक्सरमध्ये फिरवलं. हे द्रावण तिने एका आयताकृती साच्यात घालून फ्रीजरमध्ये ठेवलं. नंतर तिने गोठलेला हा भाग सोडियम ॲल्गिनेट द्रावणात ठेवला. आणि जेलीसदृश पडदा बनेपर्यंत तिने तो फिरवला. चेकेट्सच्या या खाण्यायोग्य पाण्याच्या बाटलीचं नाव ‘ईको हिरो’. या बाटलीची किंमत १.२० डाॅलर म्हणजे जवळ जवळ शंभर रुपये, या ईको हिरोमध्ये पाऊण कप पाणी धरुन ठेवलं जातं. या अंडाकृती जेलीय बाटलीचा तुकडा दातानं तोडून यातलं पाणी पिता येतं. पाणी प्यायल्यानंतर हे जेलीय आवरण खाता येतं. नाही खाल्लं आणि ते टाकून दिलं तरी या आवरणाचं जैविक विघटन होतं.
चेकेट्सच्या या प्रयोगाचं ड्यूक युनिव्हर्सिटीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॅनियल रिट्सहाॅफ यांनीही कौतुक केलं आहे. रिव्हर्स स्पेरिफिकेशन या तंत्रावर आधारित चेकेट्सनं केलेला प्रयोग कौतुकास्पद आहे. या प्रयोगाची वास्तवाच्या पातळीवर अनेक कोनातून पडताळणी होणं बाकी आहे. पण १२ वर्षांच्या मुलीनं हा प्रयोग करून जगाला दिशा मात्र नक्कीच दिली आहे.
ईको हिरोचं भवितव्य काय?
आपल्या ईको हिरो या प्रयोगाला अनेक चाचण्यांमधून जावं लागणार आहे, हे चेकेट्सला माहिती आहे. अनेक सुधारणा करुन ही खाण्यायोग्य पिण्याची बाटली जास्त ताकदीची आणि मोठ्या क्षमतेची बनवायची आहे. आपला हा प्रयोग जर सर्व प्रकारच्या चाचण्यांवर यशस्वी झाला तर मॅरेथाॅन धावणाऱ्या धावपटूंना धावण्यादरम्यान पाणी पिण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असं चेकेट्सला वाटतं.