हातात हातकड्या, पायात बेड्या... अवैध प्रवाशांसोबत बघा काय केले जाते; व्हाईट हाऊसने शेअर केला नवा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:30 IST2025-02-19T11:27:37+5:302025-02-19T11:30:07+5:30
Indian Immigrants Video: अमेरिकेतली अवैध प्रवाशांची घरवापसी सुरू आहे. या प्रवाशांना एखाद्या कुख्यात गुंडापेक्षाही वाईट पद्धतीने परत पाठवले जात आहे.

हातात हातकड्या, पायात बेड्या... अवैध प्रवाशांसोबत बघा काय केले जाते; व्हाईट हाऊसने शेअर केला नवा व्हिडीओ
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध प्रवाशांबद्दल कठोर धोरण स्विकारले आहे. अमेरिकेत अवैध मार्गाने आलेल्या आणि राहत असलेल्या जगभरातील नागरिकांना त्यांच्या देशात परत नेऊन सोडले जात आहे. पण, या प्रवाशांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे, त्यावरून वाद सुरू आहे. आता व्हाईट हाऊसनेच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात कुख्यात गुंड असल्यासारखी या प्रवाशांना वागणूक दिली जात असल्याचे दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
व्हाईट हाऊसच्या अकाऊंटवरून ४१ सेंकदाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत दाखवण्यात आले आहे की, ज्या अवैध प्रवाशांना परत पाठवले जात आहे. त्यांना कशा पद्धतीने तयार केले जात आहे.
पोलीस अधिकारी आधी प्रवाशांना हातकडी घालतो. नंतर साखळदंडाच्या बेड्या पायात घालतो. त्यानंतर त्यांना लष्करी विमानात पाठवले जात आहे.
व्हिडीओ बघा
ASMR: Illegal Alien Deportation Flight 🔊 pic.twitter.com/O6L1iYt9b4
— The White House (@WhiteHouse) February 18, 2025
संजय सिंह याची टीका
हा व्हिडीओ आपचे खासदार संजय सिंह यांनीही पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "अमेरिका दररोज भारताचा अपमान करत आहे. व्हाईट हाऊसने हातात हातकड्या आणि पायात बेड्या घालून भारतीयांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. महामानवाच्या मौनाचा देशाला त्रास होऊ लागला आहे. १४४ कोटी भारतीयांचा नेता इतका असंवेदनशील कसा काय होऊ शकतो? मोदींच्या तोंडून विरोधाचा एक शब्दही का निघत नाहीये?", असा सवाल खासदार संजय सिंह यांनी केला आहे.