या कारणामुळे भारतीय मच्छीमारांवर गोळीबार केला; श्रीलंकेकडून आले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:54 IST2025-01-28T19:54:27+5:302025-01-28T19:54:55+5:30
श्रीलंकेने भारतीय मच्छीमारांवर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय मच्छीमारांच्या काही नौका श्रीलंकेच्या हद्दीत मच्छीमारी करत होत्या.

या कारणामुळे भारतीय मच्छीमारांवर गोळीबार केला; श्रीलंकेकडून आले उत्तर
भारतीय मच्छीमारांवर श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारामुळे हे अस्वीकारार्ह्य असल्याचे म्हणत भारताने श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना पाचारण केले होते. भारताचे हे रूप पाहून नेहमी भारतीय मच्छीमारांवर गोळीबार करणाऱ्या श्रीलंकेने आताचा गोळीबार का केला याचे उत्तर दिले आहे. मच्छीमारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने बचावासाठी गोळीबार केल्याचे श्रीलंकन नौदलाचे म्हणणे आहे.
श्रीलंकेने भारतीय मच्छीमारांवर गंभीर आरोप केले आहेत. या मच्छीमारांनी संघटीतरित्या नौदलाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आणि एका अधिकाऱ्याची बंदूक खेचल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. यामुळे नौदलाला गोळीबार करावा लागल्याचे श्रीलंकेच्या नौदलाने म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयानुसार ही घटना डेल्फ्ट बेटांवरील आहे. जाफना येथील वाणिज्य दूतावास मच्छिमारांच्या संपर्कात असून त्यांची भेट घेतली असल्याचे म्हटले आहे. दोन मच्छीमार गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर जाफनामध्ये उपचार सुरु आहेत.
भारतीय मच्छीमारांच्या काही नौका श्रीलंकेच्या हद्दीत मच्छीमारी करत होत्या. त्यांना बाहेर पिटाळण्यासाठी श्रीलंकेच्या नौदलाने मोहिम सुरु केली. यावेळी एका बोटीने धोकादायक पद्धतीने बोट चालविली तसेच टक्कर देण्यासारखा प्रसंग आणला. ही बोट ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेवेळी हे मच्छीमार आक्रमकपणे वागले. या बोटीने शत्रुत्वपूर्ण पद्धतीने हल्ल्याचा प्रयत्न केला. बोटीवर नौदलाचे अधिकारी जात असताना त्यांच्यावर संघटीतपणे हल्ला केला. यामुळे नौदल कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला. यात अचानक फायरिंग झाली व दोन मच्छीमार जखमी झाल्याचे, नौदलाने म्हटले आहे.
मंगळवारी सकाळी डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने हे कृत्य केले आहे. या घटनेत पाच मच्छीमार जखमी झाले आहेत. तर यापैकी दोन मच्छीमारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेला औपचारिक विरोध दर्शविण्यासाठी भारत सरकारने श्रीलंकेच्या कार्यवाहू उच्चायुक्तांना पाचारण केले होते.