या इटालियन मुलीला व्हायचंय मांजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 09:32 AM2023-11-17T09:32:24+5:302023-11-17T09:32:48+5:30
चिआरा इथेच थांबायला तयार नाहीये. तिला आणखी शस्त्रक्रिया करून घ्यायच्या आहेत.
‘आय एम थिंकिंग आय विल बी अ प्रिटी कूल कॅट लेडी सून’- हे कुणाचं जीवनध्येय वैगेरे असू शकतं का? पण इटलीची चिआरा डेल इबेट हिला खरंच तसं व्हायचंय ! ह्युमन कॅट ! म्हणजे मनुष्यजन्मातच मांजर! आणि त्यासाठी तिने तब्बल २२ शस्त्रक्रिया आणि शरीरावर एकूण ७२ ठिकाणी पिअर्सिंग करून - म्हणजे टोचून घेऊन आपला एकूण हुलिया पालटवण्याची धडपडसुद्धा करून झाली आहे.
अलीकडेच या ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’चा एक व्हिडीओ तिने टिकटॉकवर टाकला आणि तो पाहता- पाहता व्हायरल झाला म्हणून जगाला तिच्या या विचित्र वेडाबद्दल कळलं तरी!
या चिआराचं सोशल मीडियावरचं नाव आहे आयडीन मोड! वयाच्या अकराव्या वर्षी हे मनुष्यजन्मीच मांजर होण्याचं (म्हणजे खरंतर मांजरासारखं दिसण्याचं) वेड तिच्या डोक्यात शिरलं असं ती म्हणते. गेल्या दहा वर्षांत तिने आपल्या शरीरात शस्त्रक्रियांनी बदल घडवून अनुपालन हे विचित्र स्वप्न पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. तर तिने आतापर्यंत काय- काय केलं असावं ? दोन्ही नाकपुड्यांना मधोमध छेद देऊन घेतले आहेत, दोन्ही ओठांचा आकार सिलिकॉन इम्प्लांटने वाढवून ते टोचून घेतले आहेत, जिभेला मधोमध छेद दिला आहे, ब्लेफेरोप्लास्टी नावाच्या शस्त्रक्रियेद्वारे आजूबाजूच्या भागाखालचा मेद काढून टाकून पापण्यांच्या आकारात बदल केला आहे.
डोळ्याच्या आजूबाजूच्या त्वचेवर बऱ्याच प्रक्रिया करून एकुणातच आपले डोळे मांजरीसारखे दिसतील असं काही तरी केलं आहे. एवढंच नव्हे, मांजरीला डोक्यावर दोनही बाजूला कान असतात, तसं काही तरी आपल्याही डोक्यावर असावं (म्हणजे दिसावं) म्हणून तिने डाव्या आणि उजव्या बाजूला टेंगळं करून घेतली आहेत (हे कसं केलं याचा तपशील मात्र उपलब्ध नाही)! आता एवढं केलंय म्हटल्यावर हातापायाची नखं मांजरीसारखी वाढवली असणार हे तर उघडच आहे, ते तिने केलंच आहे! शिवाय दोन्ही गालांवर गोंदवून घेऊन मांजरीला असतात तसे केस आणि मिशा काढून घेणं तर तसं सोपंच; तेही तिने अर्थातच केलं आहे!
बाकी कुणाला हे खूळ वाटेल, मूर्खपणा वाटेल; पण चिआरा मात्र तिला जे काही करायचंय त्यावर ठाम आहे. ती सांगते, ‘मला लहानपणापासूनच मांजरं खूप आवडतात. मला माझं रंगरूप बदलून काही तरी वेगळं करायचं होतं. मग विचार केला तेव्हा वाटलं, कुठलं तरी कार्टून होण्यापेक्षा आपल्याला आवडतं ते मांजरच का होऊ नये? म्हणून मग मी हे प्रयत्न सुरू केले. माझ्या शरीरात शक्य होतील तेवढे बदल करून घेण्याची माझी जिद्द आहे. आता आधुनिक तंत्र माझ्या किती मदतीला येतं आणि मांजर होण्याच्या या प्रवासात माझं शरीर मला किती साथ देतं, हे मला पाहायचंच आहे!’
चिआरा इथेच थांबायला तयार नाहीये. तिला आणखी शस्त्रक्रिया करून घ्यायच्या आहेत. ती सांगते, ‘माझे डोळे परफेक्ट कॅट आय दिसावेत यासाठी मला कँथोप्लास्टी नावाची शस्त्रक्रिया करून घ्यायची आहे, शिवाय मला माझ्या (मानवी) दातांचा आकारही बदलावा लागेल. ट्रान्सडर्मल नावाची शस्त्रक्रिया करून मी माझ्या पार्श्वभागावर फिलर्स भरून घेणार आहे. त्या फिलर्सचा आकार मांजराच्या शेपटीसारखा दिसेल!’ या इतक्या विचित्र शस्त्रक्रिया करून घेताना होणाऱ्या वेदनांचं काय? चिआरा म्हणते, ‘हे एवढं सगळं करायचं म्हणजे वेदना होणारच, पण मी त्या सहज सहन करू शकते.
वेदना काही कायमच्या असत नाहीत! माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढे कष्ट तर मला घ्यावे लागतीलच ना!’ चिआराने तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर ती चर्चेचा विषय न ठरली. अनेक लोकांनी तिला वेड्यात काढण्याचा सपाटा लावला आहे, तिच्यावर प्रचंड टीका होते आहे. हे असले प्रकार सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोकाळतात आणि त्या नादात माणसं आपल्या जगण्याचं वाट्टोळं करून घेतात असंही अनेकांना वाटतं! पण गंमत म्हणजे चिआराला पाठिंबा देणारे लोकही आहेत. ते म्हणतात, इटस् हर लाइफ! आपण कोण बरं-वाईट ठरवणारे!
आधी कुत्रा, आता मांजर!
याआधी जपानमधल्या अशाच एका अवलियाने चांगले बावीस हजार डॉलर्स खर्च करून आपलं मानवी शरीर कुत्र्यासारखं दिसेल, अशी धडपड केली आहे. या मानवी कुत्र्याचं नाव आहे टोको. या गृहस्थाने तर ‘आय वाँट टू बी ॲन अँनिमल’ या नावाने एक यूट्यूब चॅनलसुद्धा सुरू केलंय. आता या जपानी टोकोनंतर ही इटालियन मानवी-मांजर चर्चेचा विषय ठरली आहे!