Monkeypox: सेक्सशी संबंधित ही चूक तुम्हाला बनवू शकते मंकीपॉक्सची शिकार, WHOचा पुरुषांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 02:06 PM2022-07-28T14:06:48+5:302022-07-28T14:07:12+5:30
Monkeypox: जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचा धोका कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये पुरुषांच्या लैंगिक वर्तनाबाबत काही खास गोष्टींचा समावेश आहे.
न्यूयॉर्क - भारतामध्ये मंकीपॉक्स हळूहळू हातपाय पसरू लागला आहे. अनेक शहरांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण सापडू लागल्यानंतर आता हेल्थ एक्सपर्टसुद्धा आता अलर्ट मोडवर आले आहेत. जगभरात त्याचा वाढता धोका पाहून संयुक्त राष्ट्र एजन्सीनेहीा या आजाराला जागतिक आणीबाणी घोषित केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही मंकीपॉक्सचा धोका कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये पुरुषांच्या लैंगिक वर्तनाबाबत काही खास गोष्टींचा समावेश आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी सांगितले की, मंकीपॉक्सचा संसर्ग पहिल्यांदा मे महिन्यात दिसून आला होता. त्यानंतर ९८ टक्के मंकीपॉक्सचे रुग्ण हे गे, बायोसेक्सुअल आणि पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमधेये दिसून आले. लोकांनी या आजारापासून बचाव करण्यासाठी योग्य पावलं उचलावित, असा सल्ला टेड्रोस यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना आपल्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी सुरक्षित पर्याय बनलं पाहिजे. त्यासाठी सेक्सुअल पार्टनर्सची संख्यासुद्धा कमी केली पाहिजे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख पुढे म्हणाले की, मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णांनी स्वत:ला आयसोलेट केलं पाहिजे. तसेच कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून वाचलं पाहिजे. तसेच कुठलाही शारीरिक संबंध आणि नवे सेक्सुअल पार्टनर्स बनवण्यापासून सुद्धा वाचलं पाहिजे. मात्र यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सेक्सुअल पार्टनरची संख्या कमी करण्यासारखा सल्ला दिलेला नाही. एजन्सीने केवळ मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णांशी स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्स कुठलाही रुग्ण, त्याचे कपडे किंवा बेडशिट यांच्या संपर्कात येणाऱ्यांनाही बाधित करू शकतो. आरोग्य संघटनेने इशारा दिला की, कमकुवत इम्युनिटी असणाऱ्यांना उदाहरणार्थ मुले, गर्भवती महिलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता अधिक गंभीर होऊ शकते.
डब्ल्यूएचओचे सल्लागार अँडी सील यांनी सांगितले की, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मंकीपॉक्स हा स्पष्टपणे सेक्सच्या दरम्यान पसरला आहे. मात्र हा आजार यौन संचारित संसर्ग आहे का याबाबत स्पष्ट निष्कर्ष निघाला आहे.