हा ‘व्हायरस’ बसेल कानात अन् कर्णबधीर लागतील ऐकू! संशोधकांची कमाल; चीनमध्ये प्रयोग यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:40 AM2023-11-06T09:40:08+5:302023-11-06T09:40:44+5:30
या कर्णबधिर मुलांच्या कानात कोणतेही नुकसान न करणारा विषाणू बसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बीजिंग : देशातील ज्या मुलांना जन्मापासून ऐकू येत नव्हते त्यांना आता जीन थेरपीच्या यशस्वी चाचणीनंतर ऐकू येत आहे, असा दावा चीनमधील फुदन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. या कर्णबधिर मुलांच्या कानात कोणतेही नुकसान न करणारा विषाणू बसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्रायोगिक उपचारांमुळे पाचपैकी चार मुलांना ऐकू येऊ लागले. ज्या मुलांना त्यांच्या पालकांकडून मिळालेल्या श्रवण अक्षमतेमुळे ऐकू येत नाही त्यांच्यासाठी हा प्रयोग अतिशय उपयुक्त ठरणार आहे. ओटोफर्लिन जनुकामुळे ऐकण्याची क्षमता निर्माण होते.
उपचारानंतर मारली आईवडिलांना हाक
अद्याप कोणतेही औषध श्रवण सुधारण्यास सक्षम नाही, त्यामुळे चीनचे हे यश उल्लेखनीय मानले जात आहे. शांघायमधील फुदन विद्यापीठातील शल्यचिकित्सक आणि शास्त्रज्ञ यिलाई शू यांच्या मते, सुरुवातीला आम्हाला थोडी चिंता होती. उपचार यशस्वी होतील की नाही याची चिंता होती. गेल्या वर्षी डिसेंबरपासून उपचार सुरू झाले. त्यानंतर आतापर्यंत कधीच न बोललेला एक लहान मुलगा आई आणि बाबा म्हणून हाक मारू लागला.
जनुकाच्या दोन सदोष प्रतींचा परिणाम
संशोधनात सहभागी असलेल्या सर्व चिनी मुलांना ऐकू येत नव्हते. कारण त्यांना वारशाने दोषपूर्ण जनुके मिळाली होती. हे जनुक शरीर ‘ओटोफेर्लिन’ प्रथिने कसे बनवते हे ठरवते. हे प्रथिन आतील कानाला मेंदूपर्यंत आवाज पोहोचवण्याची क्षमता देते. एका मुलीला पूर्वी कॉक्लियर इम्प्लांट झाले होते, ज्यामुळे तिला ऐकू आणि बोलता आले. पण चाचणीनंतर ती स्वाभाविकपणे ऐकूही लागली.
- १.१ अब्ज तरुणांची ऐकण्याची क्षमता मनोरंजन आणि वैयक्तिक ऑडिओ उपकरणांच्या अतिवापरामुळे कमी होण्याचा धोका आहे.
- २०५० पर्यंत १० पैकी एका व्यक्तीची श्रवणशक्ती कमी होण्याची भीती आहे.
- १-३% जगभरातील लोक ओटोफर्लिन जनुक दोषाने बाधित आहेत, त्यांना ऐकण्याची क्षमता नाही.
- ६०-६५% ऐकण्याची क्षमता नवीन प्रयोगामुळे येते.
- ८०% बहिरे लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांमध्ये राहतात.