त्या १0 जणांची फाशी होणार रद्द
By admin | Published: March 30, 2017 01:43 AM2017-03-30T01:43:39+5:302017-03-30T01:43:39+5:30
एका पाकिस्तानी तरुणाच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या १0 भारतीयांना संयुक्त अरब अमिरातीतील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली
अबूधाबी : एका पाकिस्तानी तरुणाच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या १0 भारतीयांना संयुक्त अरब अमिरातीतील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली तरी त्यांची आता सुटका होण्याची शक्यता आहे. ज्या मुलाची त्यांनी हत्या केली, त्या मुलाच्या वडिलांनी त्या १0 जणांना माफ केलं आहे. तसं त्याने न्यायालयाला कळवलं आहे. एका मोहमद्द फरहान या पाकिस्तानी तरुणाची या १0 जणांनी २0१५ साली हत्या केली होती. मोहमद्द फरहानच्या वडिलांनी इस्लामिक कायदा शरीयतनुसार न्यायालयात अर्ज करून, दोघांच्या सहमतीने प्रकरण मिटवण्याची परवानगी मागितली आहे. शरियत कायद्यानुसार अशी संमती दिली जाते. अर्थात त्यासाठी ब्लडमनी द्यावा लागतो. म्हणजेच या १0 जणांना मोहम्मद फरहानच्या वडिलांना काही ठराविक रक्कम द्यावी लागेल.
न्यायालयानेही अर्जाचा सहानुभूतीने विचार करण्याची मान्य केलं आहे. माझा मुलगा आता परत येणार नाही. तसंच या १0 जणांना फाशीची शिक्षा झाल्यास त्यांची कुटुंबंही आर्थिक अडचणीत सापडतील. तसं व्हावं, अशी माझी इच्छा नाही, असं फरहानच्या वडिलांचं म्हणणं आहे. फरहानच्या वडिलांना दोन लाख डिरहाम देऊ न हे प्रकरण मिटवलं जाईल, असा अंदाज आहे. या १0 जणांकडे इतकी रक्कमही नाही. त्यामुळे दुबईत राहणारे भारतीय उद्योगपती एस. पी. सिंग ओबेराय यांची संस्था त्यांना ही रक्कम देणार आहे. हे १0 जण पंजाब व हरयाणा राज्यांतील आहेत.