‘त्या’ ८ आया लढताहेत गरिबांच्या घरासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 07:28 AM2024-07-27T07:28:36+5:302024-07-27T07:28:43+5:30

जगातल्या कुठल्याही शहरात असतात तशी इथेही गरीब माणसं रस्त्यावर राहतात. त्यांचं आयुष्य अतिशय खडतर असतं.

'Those' 8 nannies are fighting for the poor house america | ‘त्या’ ८ आया लढताहेत गरिबांच्या घरासाठी

‘त्या’ ८ आया लढताहेत गरिबांच्या घरासाठी

अमेरिका हा जगातील अनेक लोकांच्या दृष्टीने अक्षरशः स्वर्ग असतो. अमेरिका म्हणजे सगळं काही नेटकं, सुंदर, जागच्या जागी असतं अशी अनेकांची कल्पना असते. त्यातही अमेरिकेतील कॅलिफोर्निया हे राज्य म्हणजे तर निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेलं ठिकाण. हॉलिवूड आणि बेव्हर्ली हिल्ससारखी अतिप्रचंड श्रीमंत ठिकाणं याच राज्यात आहेत. याच कॅलिफोर्निया राज्यात सॅन फ्रॅन्सिस्को नावाचं गोल्डन गेट ब्रिजसाठी प्रसिद्ध असलेलं शहर आहे. प्रशस्त रस्ते, त्यावर धावणाऱ्या महागड्या गाड्या, आलिशान हॉटेल्स, टुमदार कॅफे या सगळ्या अमेरिकन श्रीमंतीला इथे मात्र एक दुखरी किनारही आहे आणि ती म्हणजे मोठ्या संख्येने रस्त्यावर राहणारी बेघर माणसं! 

जगातल्या कुठल्याही शहरात असतात तशी इथेही गरीब माणसं रस्त्यावर राहतात. त्यांचं आयुष्य अतिशय खडतर असतं. त्यांना सुरक्षितता, स्वच्छता यासारख्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहावं लागतं. पण ही माणसं ज्यावेळी तरुण असतात त्यावेळी या परिस्थितीतही ती टिकून राहू शकतात. पण ज्यावेळी लहान मुलं आणि त्यांच्या एकल मातांवर अशा परिस्थितीत राहण्याची वेळ येते, त्यावेळी ते फार जास्त कठीण होऊन बसतं. लहान मुलांना घेऊन रस्त्यावर राहणाऱ्या एकट्या महिला एकाच वेळी अनेक संकटांना तोंड देत असतात. जानेवारी महिन्यात ८ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जाणाऱ्या तापमानात मुलांना घेऊन रस्त्यावर राहायचं तरी कसं? 
मग या मुलांच्या आयांनी आपापल्या गाडीतच आपले संसार थाटले. रात्रीच्या वेळी काचा झाकून घेण्यासाठी एखादं स्वस्तातलं मिकी माऊसचं कव्हर घ्यायचं आणि तसेच दिवस भागवायचे. या बेघर लोकांसाठी सरकारने तात्पुरती निवारा केंद्रं उघडलेली आहेत. मात्र, या लहान मुलांना घेऊन तिथे राहणं या महिलांना सुरक्षित वाटत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे या निवाराघरांमध्ये असलेला अमली पदार्थांचा विळखा! येथे अमली पदार्थ सहज मिळतातही आणि त्याच वेळी त्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याची धडपड करणारेही अनेक लोक तिथे राहत असतात. या दोन्ही प्रकारची संगत लहान मुलांसाठी किती वाईट असते हे सांगण्याची गरज नाही. 
३८ वर्षांच्या जेनिफर जॉन्सन या महिलेची कथा हेच सांगते. ती स्वतः कायम रस्त्यावर वाढली. पण मोठी झाल्यावर तिने एका रिअल इस्टेट कंपनीमध्ये नोकरी मिळवली. तिला वाटलं, की अखेर तिची रस्त्यावरच्या आयुष्यातून सुटका झाली. पण दुर्दैवाने कोविडकाळात तिची नोकरी सुटली आणि तिच्या घरमालकाने ती रहात असलेलं अपार्टमेंट विकून टाकण्याचा निर्णय घेतला. या दोन घटनांमुळे जेनिफर अक्षरशः रस्त्यावर आली. ती ज्यावेळी गर्भवती होती त्यावेळचे दिवस तिने आलटून पालटून कोणा नातेवाईकाकडे किंवा मित्र-मैत्रिणींकडे राहून काढले. आता तिला दोन मुलं आहेत. त्यातील एक मुलगा १ वर्षाचा, तर एक मुलगा ३ वर्षांचा आहे. अखेर तिने सरकारकडे राहण्यासाठी घर मिळावं म्हणून अर्ज केला. त्यावेळी तिला असं सांगण्यात आलं, की ‘तिची परिस्थिती पुरेशी गंभीर नसल्यामुळे’ तिला घर मिळू शकत नाही.

३४ वर्षांच्या पोर्टर नावाच्या महिलेला ५ मुलं आहेत. तिला राहायला घर नाही. मुलांना वाढवण्यासाठी तिच्याकडे कुठलीही सपोर्ट सिस्टीम नाही.  कोविड काळापासून तिचीही आर्थिक गणितं बिघडलेली आहेत. टेनिया टरसेरो म्हणते, की आजूबाजूला गर्दुल्ले असणाऱ्या ठिकाणी मी तीन मुलींना घेऊन राहते तेव्हा मला असं वाटतं, की मी मुलींची अपराधी आहे.

पण आज या तिघींसारख्या एकूण ८ महिला एकत्र आल्या आहेत. त्या त्यांच्या मुलांसाठी सुरक्षित निवारा मागताहेत. या आठ जणी सॅन फ्रॅन्सिस्को नॉन प्रॉफिट कंपास फॅमिली सर्व्हिसेस या संस्थेने सुरू केलेल्या फॅमिली ॲडव्हायजरी कमिटीच्या प्रकल्पाचा भाग आहेत. 
या आठ जणींना आज त्यांचं घर मिळालं आहे. आता त्या लहान मुलं असणाऱ्या, रस्त्यावर राहणाऱ्या इतर महिलांना मदत करण्याचा प्रयत्न करताहेत. सॅन फ्रान्सिस्को शहरात आज घरभाडं महिन्याला सुमारे ३००० डॉलर्स (अडीच लाख रुपये) आहे आणि मध्यम आकाराच्या घराची किंमत चौदा लाख डॉलर्स (सुमारे पावणेबारा कोटी रुपये) इतकी आहे. 

बेघरांचा टक्का वाढतच चाललाय! 
कॅलिफोर्निया राज्यात आजघडीला २५,५०० हून अधिक बेघर प्रौढ व्यक्ती अशा आहेत ज्यांच्याबरोबर लहान मुलं आहेत. यात सॅन फ्रान्सिस्कोमधील ६०० लोकांचाही समावेश आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आज एकूण ७५० लोकं राहू शकतील अशा ४०० जागा आहेत. जून महिन्याच्या मध्यावर या जागांसाठी ५००हून अधिक कुटुंबांची प्रतीक्षायादी होती. २०२२ सालापेक्षा २०२३ साली मुलांसह बेघर असणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत अमेरिकेत जवळजवळ १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Web Title: 'Those' 8 nannies are fighting for the poor house america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.