इथिओपियाई वंशाचे हजारो लोक रस्त्यावर उतरले; आंदोलन, जाळपोळीने इस्राईल पेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 15:44 IST2019-07-04T15:44:20+5:302019-07-04T15:44:54+5:30
इस्राईलची राजधानी असलेल्या तेल अवीव येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

इथिओपियाई वंशाचे हजारो लोक रस्त्यावर उतरले; आंदोलन, जाळपोळीने इस्राईल पेटले
तेल अविव ( इस्राईल) - इस्राईलची राजधानी असलेल्या तेल अवीव येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. इस्राइलमध्ये पोलीस आपल्यावर अत्याचार करत असल्याचा तसेच वर्णभेद होत असत्याचा आरोप करत हे लोक रस्त्यावर उतरले असून, गेल्या 24 तासांपासून घोषणाबाजी आणि जाळपोळीचे सत्र सुरू आहे.
एका 18 वर्षीय तरुणाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर हा दंगा भडकला आहे. या तरुणाच्या मृत्यूनंतर सुमारे 20 हजार लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनास सुरुवात केली आहे. दरम्यान, जमावाकडून सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठी दंगलविरोधी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागत आहे.
तसेच जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांच्या घोडदळाचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, इस्राइल पोलिसांनी संबंधिक तरुणावर गोळीबार कऱणाऱ्या आपल्या अधिकाऱ्याला अटक केली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या हिंसाचाराचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलक रस्त्यावर प्रदर्शन करताना दिसत आहेत. या आंदोलकांच्या हातात पोस्टर्स-बॅनर दिसत आहेत, तसेच ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आंदोलनादरम्यान जाळपोळही होताना जिसत असून, आंदोलकांकडून रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने लक्ष्य केली जाताना दिसत आहे. यादरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. तसेच इस्राईल पोलिसांनी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या अनेकांना अटक केली आहे.