म्यानमारमधल्या हजारो रोहिंग्या मुस्लीमांनी घेतला बांगलादेशचा आसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 05:51 PM2017-08-23T17:51:29+5:302017-08-23T17:57:56+5:30
राखिन प्रांतामध्ये लष्करी तळ करण्याचा निर्णय म्यानमारने घेतल्यानंतर या भागातल्या हजारो रोहिंग्या मुस्लीमांनी बांगलादेशात स्थलांतर केले आहे. गेल्या ऑक्टोबरपासून म्यानमारमधल्या राखिन प्रांतात हिंसाचारानं थैमान घातलं होतं.
ढाका, दि. 23 - राखिन प्रांतामध्ये लष्करी तळ करण्याचा निर्णय म्यानमारने घेतल्यानंतर या भागातल्या हजारो रोहिंग्या मुस्लीमांनी बांगलादेशात स्थलांतर केले आहे. गेल्या ऑक्टोबरपासून म्यानमारमधल्या राखिन प्रांतात हिंसाचारानं थैमान घातलं होतं. बंडखोरांनी पोलीसांवर हल्ला करण्याचे प्रकारही वाढले होते. त्यानंतर लष्करानं बळाचा वापर केला होता. याचं वर्णन करताना संयुक्त राष्ट्रांनी रोहिंग्यांचं वंशविच्छेदन होत असल्याची भीती व्यक्त केली होती. मुख्यत: बौद्ध देश असलेल्या म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्या मुस्लीम अल्पसंख्याकांची मोठ्या प्रमाणावर वस्ती होती.
बौद्ध आणि स्वत:ला अनेक दशकांपासून राहत असल्याने स्थानिक म्हणवणारे रोहिंग्या यांच्यामध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण झाले होते. विशेष म्हणजे म्यानमारचे सरकार बौद्ध नेत्यांच्या बाजुचे असल्याचे दिसून आले असून लष्करानंही रोहिंग्या बंडखोरांच्या विरोधात बळाचे हत्यार उपसले. राखिन प्रांतात म्यानमारच्या लष्करानं केलेल्या कारवाईमुळे हजारोंच्या संख्येने रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशमध्ये आसरा घेतल्याचे रोहिंग्या नेत्यांनी सांगितल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
बांगलादेश व म्यानमार या दोन देशांची सीमा निश्चित करणाऱ्या नाफ नदीच्या बांगलादेशातील बाजुला निर्वासितांच्या छावण्या उभारण्यात आल्या असून या छावण्या क्षमतेपेक्षा जास्त भरल्याचे व सर्व यंत्रणांवर ताण पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता बांगलादेशी सीमा सुरक्षा दलाचे जवानही रोहिंग्या मुस्लीमांना मज्जाव करत असल्याचे चित्र आहे. याच आठवड्यात 31 जणांना घेऊन येत असलेली बोट बांगलादेशच्या जवानांनी परत पाठवली.
गेल्या काही दिवसांमध्ये 700 कुटुंबांनी बांगलादेशात आसरा घेतल्याचे कमाल होसेन या रोहिंग्या नेत्याने सांगितले. राखिनमधल्या आमच्या घरावर स्थानिक बौद्धांनी हल्ला केल्यामुळे आणि आमची घरं लुटल्यामुळे आपण 40 नातेवाईकांसह बांगलादेशात आल्याचे मोहम्मद उमर या तरूणाने सांगितले.
राखिनमध्ये सुमारे 10 लाख रोहिंग्या मुस्लीम राहत असून त्यांना म्यानमारमधील बांगलादेशी घुसखोर म्हणून समजण्यात येते आणि त्यांना नागरिकत्वापासून ते किमान मानवी अधिकारापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी वंचित ठेवण्यात येते.
गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या या आपत्तीमुळे आत्तापर्यंत सुमारे चार लाख रोहिंग्या मुस्लीमांनी बांगलादेशात आसरा घेतल्याचा दावा बांगलादेशातील सरकारी अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्येच 70 हजार रोहिंग्यांनी बांगलादेशात आसरा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे रोहिंग्या मुस्लीमांना मुस्लीम बहुसंख्य असलेला बांगलादेशही जवळ करण्यास उत्सुक नाहीये. अमली पदार्थांच्या वाहतुकीसारख्या गुन्ह्यांमध्ये रोहिंग्या मुस्लीम असल्याचा आरोप बांगलादेशी पोलीस करत आहेत. लाखाच्या घरातील रोहिंग्या मुस्लीमांचं मुख्य वस्तीपासून लांब पुनवर्सन करण्याचा विचार बांगलादेशी सरकारनं व्यक्त केला आहे.