ढिगाऱ्याखाली अडकले हजारो
By admin | Published: April 27, 2015 04:16 AM2015-04-27T04:16:25+5:302015-04-27T13:09:18+5:30
भूकंपग्रस्त भागांमध्ये युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू असतानाच रविवारी पुन्हा भूकंपाच्या दोन धक्क्यांनी नेपाळ हादरला...
काठमांडू/ नवी दिल्ली : शनिवारच्या विनाशकारी भूकंपाने उध्वस्त झालेल्या भागांमध्ये युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू असतानाच रविवारी पुन्हा भूकंपाच्या दोन नवीन धक्क्यांनी नेपाळ हादरला. हे धक्के भारताच्या उत्तर व पूर्वेकडील राज्यांमध्येही जाणवले.
शनिवारपासून उघड्यावर राहणाऱ्या लाखो लोकांमध्ये यामुळे आणखी भीतीचे वातावरण पसरले. त्यातच काठमांडू व परिसरात मुसळधार पावसाच्या शक्यतेने भूकंपग्रस्त व मदत पथकांच्या विघ्नांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. शनिवारचा भूकंप व पडझड यामुळे नेपाळमध्ये मरण पावणारांची संख्या आता २,५०० पर्यंत पोहोचली असून, ६,२३९ लोक जखमी आहेत. मृतांत पाच भारतीयही आहेत. भारतातील मृतांची संख्या ६२ वर पोहोचली असून, त्यांना केंद्राने प्रत्येकी सहा लाखांची मदत जाहीर केली आहे. काठमांडू खोऱ्याला भूकंपाचा जबर धक्का बसला असून, या खोऱ्यातील मृतांची संख्या वाढत आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध अजूनही घेतला जात असून, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. भूकंपानंतर नेपाळने आणीबाणी जाहीर केली असून, भारतासह परदेशांची मदत पथके नेपाळमध्ये पोहोचली आहेत. मदत पथके ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. नव्या धक्क्यांमुळे, तसेच वादळी हवामानामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. दुपारी ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’मध्ये मोदी यांनी नेपाळच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली. आजच्या भूकंपाच्या नव्या धक्क्यांमुळे त्रिशुली हैडल प्रकल्पातील एक बोगदा खचला असून, त्यात ६० कामगार दबल्याचे वृत्त आहे. रुग्णालयांमध्ये हजारो जखमींवर उपचार करीत आहेत.