चीनमधील हेनान प्रांतात हजार वर्षांतील प्रचंड पाऊस; शाळा, रुग्णालयांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 06:00 AM2021-07-22T06:00:41+5:302021-07-22T06:01:42+5:30

अनेक शहरांना पुराचा वेढा; भुयारी रेल्वेमार्गात १२ जणांचा बुडून मृत्यू

thousands of years of heavy rains in henan Province China | चीनमधील हेनान प्रांतात हजार वर्षांतील प्रचंड पाऊस; शाळा, रुग्णालयांचा संपर्क तुटला

चीनमधील हेनान प्रांतात हजार वर्षांतील प्रचंड पाऊस; शाळा, रुग्णालयांचा संपर्क तुटला

Next

हेनान :चीनमधील हेनान प्रांतामध्ये गेल्या हजार वर्षात झाला नव्हता इतका प्रचंड पाऊस शनिवारपासून कोसळत आहे. त्यामुळे या भागातील अनेक शहरांत पुरस्थिती निर्माण झाली असून झेंगझोऊ येथे भूयारी रेल्वेच्या मार्गात पाणी शिरून १२ जण बुडून मरण पावले आहेत. हेनान प्रांतातील हजारो जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चीनमध्ये गेल्या तीन दिवसांत निर्माण झालेली ही पुरस्थिती अतिशय गंभीर असल्याचे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी म्हटले आहे.

झेंगझोऊ येथे भूयारी रेल्वे मार्गामध्ये पुराचे पाणी शिरून अनेक प्रवासी अडकले होते. गळ्यापर्यंत साचलेल्या पाण्यातून प्रवासी वाट काढत भूयारी रेल्वेमार्गातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्यातील १२ जण बुडून मरण पावले आहेत. अडकलेल्या प्रवाशांचे जे प्रचंड हाल झाले, त्याची छायाचित्रे व व्हिडीओ समाजमाध्यमांवर झळकले आहेत.

प्रचंड पावसाचा सर्वात मोठा तडाखा झेंगझोऊ शहराला बसला आहे. तेथील यलो नदीला पूर आला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी हेनान प्रांतातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर पथके तिथे रवाना केली आहेत. तेथील पावसाचे प्रमाण व पूरस्थिती ही अतिशय गंभीर असल्याचेही जिनपिंग यांनी म्हटले आहे. हेनानमध्ये आणखी तीन दिवस संततधार कोसळण्याची शक्यता आहे. झेंगझोऊमध्ये शनिवार रात्रीपासून ६१७.३ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. हेनान प्रांताची लोकसंख्या १० कोटी आहे. संततधारेमुळे पुराच्या पाण्याचे प्रमाण आणखी वाढले तर लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे मोठे आव्हान चीन सरकारसमोर उभे राहाणार आहे. हेनान प्रांताकडे येणाऱ्या व तिथून जाणाऱ्या रेल्वेची सेवा काही काळ स्थगित करण्यात आली आहे. या प्रांतातील दहा ते बारा शहरांमधील रस्ते पुरामुळे जलमय झाले आहेत. विमान वाहतूकही विस्कळीत झाली आहे. हेनानमधील अनेक धरणांना पुरामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

शाळा, रुग्णालयांचा संपर्क तुटला

हेनानमधील शाळा, रुग्णालये यांचा इतरांशी संपर्क तुटला आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थी अडकले असण्याची भीती आहे. तर रुग्णालयांमध्ये आजारी व्यक्तींच्या उपचारांमध्ये पुरस्थितीमुळे अडथळे निर्माण झाले आहेत. वैद्यकीय साधने, उपकरणे व मनुष्यबळ यांचा तुटवडा पुरामुळे जाणवत आहे. पुरामुळे असंख्य घरांची पडझड झाली आहे. शेकडो लोकांनी तात्पुरत्या निवासी छावणीत आश्रय घेतला आहे.
 

Web Title: thousands of years of heavy rains in henan Province China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.