इसिसविरोधी देशांना धमकी
By admin | Published: December 28, 2015 12:26 AM2015-12-28T00:26:30+5:302015-12-28T00:26:30+5:30
इसिसविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशांना इसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी याने धमकी दिली आहे, तर अमेरिका व पाश्चात्त्य राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांनी आमचा निर्धार आणखी दुणावला आहे,
बगदाद : इसिसविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशांना इसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी याने धमकी दिली आहे, तर अमेरिका व पाश्चात्त्य राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांनी आमचा निर्धार आणखी दुणावला आहे, असेही बगदादी याने म्हटले आहे.
इसिसने बगदादीचा २४ मिनिटांचा नवा आॅडिओ जारी केला आहे. यात बगदादीने म्हटले आहे की, विविध राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यानंतरही आमची ताकद उलट वाढलीच आहे. मे महिन्यानंतरचा बगदादीचा हा पहिलाच संदेश आहे.
हा आॅडिओ अशा वेळी प्र्रसिद्ध झाला आहे, जेव्हा इराक आणि सीरियामधून इसिसला अनेक भागातून मागे हटावे लागत आहे. इराकचा सिंजर भाग आणि सीरियाच्या सीमावर्ती भागाला इसिसच्या ताब्यातून मागील महिन्यातच मुक्त करण्यात आले आहे हे विशेष.
आॅडिओमध्ये बगदादी याने म्हटले आहे की, आमच्याविरुद्ध जगातील प्रमुख देश एकत्र येतात ही आमच्यासाठी इतिहासातील अभूतपूर्व बाब आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संघटन ना आम्हाला भीती दाखवू शकते ना आमचा संकल्प तोडू शकते. कारण आम्ही विजेते आहोत. जमिनीवरून लढाई न करणाऱ्या अमेरिकेला आव्हान देताना बगदादीने म्हटले आहे की, त्यांच्यात जमिनीवर उतरण्याची हिंमत नाही. कारण त्यांना आमचे भय आहे. अमेरिका व त्यांचे समर्थक आमचे वर्चस्व संपविण्याचे स्वप्न पाहत आहेत. (वृत्तसंस्था)