इराणच्या अणुकरारामुळे अण्वस्त्र प्रसाराचा धोका
By admin | Published: March 16, 2015 11:44 PM2015-03-16T23:44:43+5:302015-03-16T23:44:43+5:30
राष्ट्रेही तशाच अधिकाराची मागणी करतील आणि त्यातून अणुइंधन स्पर्धा सुरू होईल, असा इशारा सौदी राजघराण्याच्या एका वरिष्ठ सदस्याने दिला आहे.
वॉशिंग्टन : इराणच्या अणुकार्यक्रमावर करार झाल्यानंतर सौदी अरेबिया व इतर राष्ट्रेही तशाच अधिकाराची मागणी करतील आणि त्यातून अणुइंधन स्पर्धा सुरू होईल, असा इशारा सौदी राजघराण्याच्या एका वरिष्ठ सदस्याने दिला आहे.
सौदीचे राजकुमार तुर्की अल-फैसल यांनी ‘बीबीसी’शी बोलताना हा इशारा दिला. इराणच्या अणुकार्यक्रमावरील करार इतर राष्ट्रांना अणुइंधन विकसित करण्याला बाध्य करील व यातून अणुतंत्रज्ञानाच्या व्यापक प्रसाराचा धोका संभवतो, असे ते म्हणाले.
सहा जागतिक सत्ता इराणचा अणुकार्यक्रम बंद करण्याऐवजी तो मर्यादित करण्याच्या करारावर वाटाघाटी करीत आहेत. सौदी-इराण शत्रुत्वाच्या दृष्टिकोनातून अशा करारामुळे या भागात अण्वस्त्र स्पर्धा सुरू होऊ शकते, असा तज्ज्ञांचा युक्तिवाद आहे. तुर्की अल-फैसल म्हणाले की, इराण व सहा जागतिक सत्तांच्या वाटाघाटीचे काहीही फलित असू द्या. आम्हालाही तेच मिळायला हवे, अशी आमची भूमिका राहील. जर इराणकडे युरेनियम समृद्ध करण्याची क्षमता असेल, तर तशी क्षमता आपलीही असावी, असे केवळ एकट्या सौदी अरेबियाला वाटणार नाही, असेही ते म्हणाले.
राजकुमार तुर्की अल-फैसल यांनी यापूर्वी सौदीचे गुप्तचर प्रमुख म्हणून, तसेच देशाचे अमेरिका व ब्रिटनमधील राजदूत म्हणून काम केले आहे. सध्या ते कोणत्याही पदावर नाहीत.