पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयकडून जिवाला धोका; हिंसाचारावरील सुनावणीवर इम्रान खानचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 05:24 PM2024-08-27T17:24:08+5:302024-08-27T17:24:26+5:30
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने इम्रान खान सरकार उलथवून लावण्यात आले होते.
पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेला क्रिकेटर आणि माजी पंतप्रधान इम्रान खानने त्याच्या जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. त्याच्या या परिस्थितीला पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय जबाबदार असल्याचा आरोप इम्रान खानने केला आहे.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने इम्रान खान सरकार उलथवून लावण्यात आले होते. तेव्हापासून इम्रान खान रावळपिंडीच्या तुरुंगात बंद आहे. पाकिस्तानी क्रिकेटच्या खराब परिस्थितीवरही इम्रानने ताशेरे ओढले आहेत.
जेलमधील कारभारावर आयएसआय नियंत्रण ठेवत आहे. मला काही झाले तर लष्कर प्रमुख आणि आयएसआयचे महासंचालक (डीजी) जबाबदार असतील, असा आरोप इम्रान खानने केला आहे. निवडणुकीत हेराफेरी झाली आहे. खरा जनादेश असलेले सरकारच परिस्थिती सुधारण्यासाठी योजना करू शकते, असा दावा इम्रानने केला आहे.
वझिराबादच्या हल्ल्यावेळच्या सीसीटीव्हीचे फुटेज चोरी करण्यात आले आहे. हल्ल्यापूर्वीच आयएसआयने तो परिसर नियंत्रणात आणला होता. माझ्या जेवणाच्या सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना चौथ्यांदा बदलण्यात आले आहे,, असे इम्रानने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
गेल्यावर्षी इम्रानला अटक झाल्यानंतर हिंसाचार उफाळला होता. यामध्ये इम्रानच्या समर्थकांनी अनेक सैन्याच्या ठिकाण्यांना नुकसान पोहोचविले होते.