तीन ‘देवदूत’ नोबेलचे मानकरी
By admin | Published: October 6, 2015 05:22 AM2015-10-06T05:22:00+5:302015-10-06T05:22:00+5:30
जगभरात दरवर्षी लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या मलेरिया, हत्तीरोग आणि ‘रिव्हर ब्लार्इंडनेस’ या तीन प्रमुख रोगांवर परिणामकारक औषधयोजना ज्यांच्या संशोधनाने शक्य
मोलाचे संशोधन : मलेरिया व हत्तीरोगावरील औषधांचे जनक
मुंबई : जगभरात दरवर्षी लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या मलेरिया, हत्तीरोग आणि ‘रिव्हर ब्लार्इंडनेस’ या तीन प्रमुख रोगांवर परिणामकारक औषधयोजना ज्यांच्या संशोधनाने शक्य झाली अशा तीन ‘देवदूतां’ना वैद्यकशास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. विल्यम कॅम्बेल, सतोशी ओम्युरा आणि श्रीमती यूयू तू अशी त्यांची नावे आहेत.
या तिघांच्या संशोधनाने ज्या रोगांवर उपचार शक्य झाले ते तिन्ही रोग परजीवी कृमींचा मानवी शरीरात शिरकाव झाल्याने होणारे रोग आहेत. आजही जगाच्या पाठीवरील १०० देशांमधील ३.४ अब्ज लोक या घातक रोगांच्या छायेत आहेत. यावरून या तिघांनी केलेले काम किती मूलगामी व उपकारक आहे, याची कल्पना यावी. जंत आणि दोऱ्यासारख्या गोलाकार परजीवी कृमींमुळे (राऊंडवर्म पॅरासाईट्स) होणाऱ्या ‘रिव्हर ब्लाइंडनेस’ व ’एलिफन्टाइससिस’ (हत्तीरोग) या रोगांवर जालीम उपाय म्हणून वापरल्या जाणाऱ्या ‘अॅव्हरमेक्टिन’ या औषधीद्रव्याच्या संशोधनासाठी डॉ. विल्यम सी. कॅम्बेल व डॉ. सतोशी ओम्युरा यांना तसेच मलेरियावर रामबाण ठरलेल्या ‘अर्टेमिसिनिन’ या औषधीद्रव्याचा शोध लावल्याबद्दल डॉ. यूयू तू या महिलेला नोबेल पुरस्कार जाहीर झाला. पुरस्काराची अर्धी रक्कम कॅम्बेल व ओम्युरा यांना विभागून व अर्धी रक्कम यूयू तू यांना दिली जाईल.
सन १९०१ पासून दिल्या जाणाऱ्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे कॅम्बेल हे २०८ वे, ओम्युरा २०९वे व यूयू तू या २१० व्या मानकरी आहेत.
पुरस्कारविजेते आणि त्यांच्या संशोधनाचा थोडक्यात परिचय असा:
डॉ. सतोशी ओम्युरा- जन्म १९३५, यामानाशी जिल्हा, जपान. तोक्यो येथील कितासाटो विद्यापीठात फ्रोफेसर एमिरिटस. सूक्ष्मजीवशास्त्राला संपूर्ण जीवन वाहून घेतलेल्या डॉ. ओम्युरा यांनी जमिनीत राहणारे ‘स्ट्रेप्टोमायसेस’ या प्रजातीचे जीवाणू व त्यांच्यापासून प्रतिजैविक द्रव्ये शोधून काढण्यासाठी अथक संशोधन केले. त्यांनी मातीच्या नमुन्यांमधून नव्या प्रकारचे ‘स्ट्रेप्टोमायसेस’ जीवाणू वेगळे केले व त्यांची प्रयोगशाळेत वाढ केली.अशा प्रकारे प्रयोगशाळेत तयार केलेल्या जीवाणूंच्या हजारो ‘कल्चर’मधून त्यांनी औषधी गुणधर्मासाठी सर्वोत्तम ठरू शकतील अशी सुमारे ५० ‘कल्चर’ वेगळी काढली. यापैकीच एका ‘कल्चर’मध्ये ‘स्ट्रेप्टोमायसेस अॅव्हमिटलिस’ या जातीचा जीवाणू होता. आज वरदान ठरलेल्या ‘अॅव्हरमेक्टिन’ या औषधाचे हेच मूळ आहे.
विल्यम कॅम्बेल- जन्म १९३०, रॅमेल्टन, आयर्लंड येथे. कित्येक वर्षे मर्क इन्स्टिट्यूट फॉर थेरॉप्युटिक रीसर्चमध्ये संशोधन. सध्या अमेरिकेत मॅडिसन, न्यू जर्सी येथील ड्र्यु विद्यापीठात फेलो एमिरिटस.
डॉ. कॅम्बेल हे परजीवी जीवशास्त्रातील संशोधक आहेत. डॉ. ओम्युरा यांनी प्रयोगसाळेत विकसित केलेल्या ‘स्ट्रेप्टोमायसेस कल्चर’मधील एक घटक पाळीव आणि शेतीच्या जनावरांमध्ये आढळणाऱ्या परजीवी कृमींवर अत्यंत प्रभावीपणे परिणामकारक ठरते, असे त्यांनी संशोधनाने सिद्ध केले. याच जैवसक्रिय घटकाचे त्यांनी अधिक शुद्धिकरण करून त्यांनी त्याचे नामकरण ‘अॅव्हरमेक्टिन’ असे केले. कालांतराने याच द्रव्याच्या रासायनिक गुणसूत्रांमध्ये फेरफार करून अधिक प्रभावी असे ‘आयव्हेरमेक्टिन’ हे संयुग तयार केले गेले. मानवी शरीरात शिरकाव करून अनेक प्रकारचे प्राणघातक रोग निर्माण करणाऱ्या परजीवी कृमींवर हा अक्सिर इलाज ठरला.
डॉ. यूयू तू- जन्म १९३०, चीनमध्ये. बिजिंग येथील ‘ चायना अॅकॅडमी आॅफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन’मध्ये ५० वर्षांहून अधिक काळ अध्ययन व संशोधन. आज जगभर मलेरियावर परिणामकारक म्हणून वापरले जाणारे ‘अर्टेमिसिनिन’ नावाचे औषधीद्रव्य हे यूयू तू व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनाचे फलित आहे. इतर औषधांसोबत ‘अर्र्टेमिासिनिन’ची योजना केली तर मलेरियाने मृत्यूचे प्रमाण ढोबळमानाने २० टक्क्यांनी तर मुलांमध्ये ३० टक्क्यांनी कमी होते. यूयू तू यांनी ‘अर्टेर्मिसिनिन’ कसे शोधून काढले याची कथा मोठी रोचक व आज प्राचीन भारतीय ज्ञानविज्ञानाला उर्जितावस्था आणण्याची भाषा बोलणाऱ्यांना प्रेरक ठरणारी आहे. अमेरिकी सैन्याविरुद्ध व्हिएतनामचे क्रांतीकारी व्हिएतकाँग योद्धे प्राणपणाने लढत होते. परंतु दोन्ही बाजूच्या सैन्यासाठी मलेरिया कर्दनकाळ ठरत होता.
मलेरियाचे कारण ठरणारे परजीवी जिवाणू त्यावेळी सर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘क्लोलोक्विन’ला जुमानेसे झाले होते. काही तरी नवा उपाय शोधणे गरजेचे होते. उत्तर व्हिएतनामच्या नेत्यांनी मित्रराष्ट्र असलेल्या चीनला गळ घातली. त्यावेळी माओ त्से तुंग चीनचे सर्वेसर्वा होते व चीनमध्ये ‘सांस्कृतिक क्रांती‘ची उलथापालथ सुरु होती. माओ यांनी २३ मे १९६७ रोजी तातडीची बैठक घेऊन मलेरियावर नवे औषध शोधण्याचा ‘प्रॉजेक्ट ५२३’ हा देशव्यापी गुप्त कार्यक्रम हाती घेतला. संपूर्ण चीनमधील ६० प्रयोगशाळांमधील ५०० हून अधिक वैज्ञानिक व संशोधक युद्धपातळीवर या कामाला लागले. श्रीमती यूयू तू या संशोधन मोहिमेच्या प्रमुख होत्या. या संशोधकांनी प्राचीन चिनी वैद्यकशास्त्रावरील ग्रंथ धुंडाळले. त्यात उल्लेख असलेल्या दोन हजाराहून अधिक वनौषधींचा त्यांनी अभ्यास केला.
यातूनच त्यांना गे हाँग यांनी सुमारे १७०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘ दि हॅण्डबूक आॅफ प्रिस्क्रिप्शन्स फॉर इमर्जन्सी ट्रीटमेंट’ या हस्तलिखितात चिनी भाषेत ‘क्विंगघाओ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या (अर्टेमिसिया अॅन्युआ किंवा स्वीटवूड) या वनस्पतीचा उल्लेख आढळला. त्याच हस्तलिखितीत त्या वनस्पतीचा अर्क कसा काढावा याची कृतीही दिलेली होती. यूयू तू व त्यांच्या सहकाऱ्यांनी या वनस्पतीमधील मूळ औषधीद्रव्य वेगळे काढण्यात यश मिळविले. रंगहीन व स्फटिकरूपी या द्रव्यास त्यांनी चिनी भाषेत ‘क्विंगघाओसू’ असे नाव दिले. हेच आज मलेरियाविरुद्ध वापरले जाणाऱ्या औषधातील ‘‘अर्टेमिसिनिन’.