एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचे हमासने केले अपहरण, VIDEO देखील व्हायरल केला...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 08:09 PM2023-10-11T20:09:01+5:302023-10-11T20:10:42+5:30
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अनेक भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासमध्ये युद्ध पेटले आहे. इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अनेक भागात घुसखोरी केली आणि मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवला. यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने लोकांचे अपहरण करुन त्यांना गाझा येथे नेले. अपहरण झालेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचाही समावेश आहे. नातेवाइकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून त्यांची ओळख पटवली. या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, हमासच्या दहशतवाद्यांनी 150 हून अधिक महिला, पुरुष, लहान मुले आणि वृद्धांचे अपहरण केले आहे. या सगळ्यांना गाझा येथे ओलीस ठेवण्यात आले आहे. तसेच, इस्रालयच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नरसंहार आणि महिलांवर बलात्कार झाल्याच्या बातम्याही येत आहेत. दुस-या महायुद्धाच्या नरसंहारानंतर हमासने केलेला हल्ला, हा ज्यूंच्या इतिहासातील सर्वात मोठा हल्ला म्हणून ओळखला जात आहे.
व्हिडिओवरून नातेवाईकाने ओळख पटवली
रिपोर्टनुसार, हमासने एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचे अपहरण केले आहे. बिबास सिल्व्हरमन कुटुंब इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या किबुट्झ नीर ओझमध्ये राहत होते. हमासने त्यांच्या अपहरणाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या कुटुंबातील नातेवाईकांना हा व्हिडिओ दिसला आणि त्यांनी त्यांची ओळख पटवली. नातेवाइकाचे अपहरण झाल्याचा व्हिडीओ पाहून, त्यांना मोठा धक्का बसला आहे.