बगदादच्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला; तीन रॉकेट्सने इराक हादरलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 06:54 PM2023-12-08T18:54:00+5:302023-12-08T18:55:31+5:30
मृतांची संख्या, पायाभूत सुविधांच्या नुकसानीबाबत अद्यापही स्पष्ट माहिती नाही
शुक्रवारी, इराकची राजधानी बगदादमध्ये जोरदार तटबंदी असलेल्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ले करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉकेट ग्रीन झोनमधील दूतावासाच्या आसपास पडले, जिथे काही मुख्य इराकी सरकारी कार्यालये देखील आहेत. एएफपीनुसार, एका इराकी सुरक्षा अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी वाजता अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करणारी तीन कात्युषा रॉकेट टायग्रिस नदीजवळील ग्रीन झोनजवळ पडली.
सावधानतेचा अलार्मही वाजला
एका अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की अलार्म वाजला होता. 'हल्ल्याच्या आधीच्या सूचनांचा अंदाज देणारा आवाज' यूएस दूतावास आणि युनियन III तळाजवळ ऐकू येऊ शकत होता, जिथे आंतरराष्ट्रीय जिहादी विरोधी यांचे संंमिश्र सैन्य तैनात आहे. अमेरिकन अधिकाऱ्याने असेही सांगितले की, 'आम्ही अजूनही मृतांची संख्या आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीबाबतच्या अधिकृत अहवालाची वाट पाहत आहोत. हल्ल्याच्या स्वरूपाबाबतच्या अधिकृत अहवालाचीही आम्ही वाट पाहत आहोत.
इराकच्या राजधानीतील युनायटेड स्टेट्स दूतावासावर ऑक्टोबरच्या सुरुवातीस इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून हा पहिलाच हल्ला आहे. त्यामुळे प्रादेशिक तणाव वाढला आहे आणि व्यापक संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. तथापि, ऑक्टोबरच्या मध्यापासून इराक तसेच सीरियामध्ये यूएस किंवा युती सैन्यावर इराण समर्थक गटांकडून डझनभर रॉकेट किंवा ड्रोन हल्ले झाले आहेत. तसेच इस्लामिक स्टेट या दहशवादी संघटनेला रोखण्याच्या प्रयत्नात इराकमध्ये सुमारे 2,500 अमेरिकन आणि सीरियामध्ये सुमारे 900 सैनिक आहेत.