पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीला झाला कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 04:26 PM2017-08-23T16:26:21+5:302017-08-23T16:29:49+5:30

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. शरीफ यांच्या पत्नीला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे.

Throat cancer nawaz sharif wife kulsum sharif | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीला झाला कॅन्सर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीला झाला कॅन्सर

Next
ठळक मुद्देपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. शरीफ यांच्या पत्नीला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. कुलसुम नवाज यांना गळ्याचा कॅन्सर झाल्याची माहिती आहे.  

लाहोर, दि. 23 - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. शरीफ यांच्या पत्नीला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. कुलसुम नवाज यांना गळ्याचा कॅन्सर झाल्याची माहिती आहे.  
कुलसुम नवाज गेल्या आठवड्यात लंडनमध्ये मेडिकल टेस्ट करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांचा कॅन्सर  प्राथमिक टप्प्यात असतानाच निदान झाल्याने त्यावर उपचार करता येणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होणार आहेत. 
28 जुलै रोजी नवाज शरीफ यांना पनामा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर कुलसुम यांनी पोटनिवडणुकांसाठी शरीफ यांच्या जागी अर्ज भरला होता.
काय झालं नेमकं 28 जुलै रोजी- 
बहुचर्चित पनामागेटप्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. नवाज शरीफ यांना पंतप्रधान पदावरुनही हटवण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात राजकीय भूकंपच आला आहे. पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी न्यायालयाने नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर नवाज शरीफ पंतप्रधानपदावरुन पायउतार झाले आहेत.
पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी काही दिवसांपुर्वी संपली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला होता. यावेळी अनेक राजकीय विश्लेषकांनी न्यायालयाचा निर्णय नवाज शरीफ यांच्याविरोधात जाईल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे न्यायालयाने नवाज शरीफ यांच्याविरोधात निर्णय दिला असून त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आणली आहे. 
तीन सदस्यीय खंडपीठासमोर संपुर्ण सुनावणी पार पडली होती. न्यायाधीश एजाज अफजल यांच्या अध्यतेखालील खंडपीठात शेख अजमत सईद आणि इजाजूल एहसान यांचा समावेश होता. सुनावणी पुर्ण झाल्यानंतर निकालासाठी कोणतीही तारीख त्यांनी जाहीर करण्यात आली नव्हती. निकाल देत असताना कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं न्यायाधीस सईद यांनी यावेळी सांगितलं होतं. सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपास पथकाने सादर केलेल्या अंतिम अहवालावरही चर्चा करण्यात आली होती. 
 काय आहे पनामागेट प्रकरण?
श्रीमंत व धनाढ्य नागरिक स्वत:ची संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे टॅक्स चोरतात? काय क्लुप्त्या लढवतात, यासंबंधीची माहिती अत्यंत गोपनीयतेने काम करणा-या पनामाच्या मोसेक फोन्सेका कंपनीची महत्वपूर्ण व गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने समोर आली होती. या यादीत जगभरातील अनेक महत्वपूर्ण , धनाढ्य व्यक्ती,उद्योगपती,  सेलिब्रिटी, राजकारण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत ५०० भारतीयांचीही नावेदेखील आहेत. 
मोसेक फोन्सेका आपल्या ग्राहकांना काळा पैसा सफेद करण्यासाठी तसंच नियमांमधून वाचवण्यासाठी आणि करातून सूट मिळावी यासाठी कशा प्रकारे मदत करायची ही माहिती या कागदपत्रांमधून समोर आली होती. 
ही कागदपत्रे लीक झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, सीरियामधील राष्ट्राध्यक्ष बशर अल असद, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांनीदेखील संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे पनामाची मदत घेतली ही माहिती समोर आली होती. एकीकडे जगभरातील इतकी मोठे नावे समोर आली असताना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचं नावदेखील समोर आलं होते. ब्लादिमीर पुतिन यांनी जवळच्या मित्रांची मदत करण्यासाठी पनामाचा वापर केल्याची माहिती उघड झाली होती. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनोल मेस्सीचादेखील यामध्ये समावेश आहे.

Web Title: Throat cancer nawaz sharif wife kulsum sharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.