सिडनीत थरार!
By admin | Published: December 16, 2014 04:02 AM2014-12-16T04:02:15+5:302014-12-16T04:02:15+5:30
एका सशस्त्र इराणी माथेफिरूने शहराच्या मध्यवस्तीतील लोकप्रिय कॅफेमध्ये ओलीस ठेवलेल्या सर्वांची पोलिसांनी मुक्तता केल्याने आॅस्ट्रेलियाचे हे सर्वात मोठे शहर अखेर १८ तासांनी भयमुक्त झाले.
सिडनी : एका सशस्त्र इराणी माथेफिरूने शहराच्या मध्यवस्तीतील लोकप्रिय कॅफेमध्ये ओलीस ठेवलेल्या सर्वांची पोलिसांनी मुक्तता केल्याने आॅस्ट्रेलियाचे हे सर्वात मोठे शहर अखेर १८ तासांनी भयमुक्त झाले. दुर्दैवाने या भयनाट्यात दोन ओलिसांचा मृत्यू झाला व काही पोलिसांसह अनेक जखमी झाले. दोघांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सुखरूपपणे सुटका झालेल्यांमध्ये विश्वकांत अंकीरेड्डी (३०, रा. गुंटूर, आंध्र प्रदेश) व पुष्पेंदू घोष या भारतीयांचाही समावेश आहे. अंकीरेड्डी हे इन्फोसिस या आयटी कंपनीचे अधिकारी आहेत. घोष यांच्याविषयीची इतर माहिती लगेच मिळाली नाही.
ओलीसनाट्य संपले आहे. अधिक तपशील यथावकाश देऊ, असा संदेश न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी स्थानिक वेळेनुसार पहाटे २.४५ वाजता टिष्ट्वटरवर टाकल्यावर दिवसभर जीव मुठीत धरलेल्या शहराने सुटकेचा नि:श्वास टाकला. या ओलीस नाट्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारा माथेफिरू ५० वर्षांचा मन हरून मोनीस हा स्वत:ला इस्लामी धर्म प्रचारक म्हणविणारा इराणी निर्वासित आहे. कॅफेत घुसलेल्या सशस्त्र पोलिसांशी झालेल्या झटापटीत मोनीस मारला गेल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले.
अखेर सुटका झाली...
हे ओलीसनाट्य सुरू होऊन पाच तास उलटल्यानंतर एका महिलेसह पाच ओलीस कॅफेमधून पळत पळत बाहेर आले. दोघे जण पुढच्या दरवाजाने बाहेर पडले, तर एकाने धुराड्यातून मार्ग काढला. तासाभराने आणखी दोन जण बाहेर पडले. त्यानंतर काही तासांनी ओलीस असलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
ओलीसनाट्याचा सूत्रधार असणारा मोनीस चाळिशीतील असून, त्याने काळे जाकीट घातले होते. अफगाणिस्तानात आॅस्ट्रेलियन सैनिक तैनात केल्याच्या निषेधार्थ या माथेफिरूने हे कृत्य केले असावे, असा एक अंदाज आहे.
आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्वच खेळाडूंना कडक सुरक्षा पुरविली असून, बीसीसीआय परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. सिडनीतील हल्ला दुर्दैवी
आणि अमानवी आहे. या कठीण समयी भारत आॅस्ट्रेलियाच्या सोबत होता आणि यापुढेही राहील.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
इमारती केल्या रिकाम्या; रस्ते, रेल्वेही बंद
मार्टिन प्लेसमधील लिंड्ट चॉकलेट कॅफेमध्ये हे नाट्य घडले. हे ठिकाण शहराच्या अत्यंत मध्यवस्तीतील आहे. येथून संसद, सिडने आॅपेरा हाऊस, स्टेट लायब्ररी, अमेरिकेची वकिलात व न्यायालये जवळ आहेत. या इमारती रिकाम्या करून घेण्यात आल्या होत्या. तसेच बाजूचे सर्व रस्ते व रेल्वेसेवाही बंद करण्यात आली होती.
माथेफिरूच्या मागण्याआॅस्ट्रेलियाचे पंत्रधान टोनी अॅबट यांच्याशी बातचीत करू द्यावी. ‘इसिस’ या दहशतवादी इस्लामी संघटनेचा ध्वज आणून द्यावा.