तिबेटमध्ये हाहाकार; भूकंपामुळे 3 तासांत 50 वेळा हादरली पृथ्वी, 1000 घरे जमीनदोस्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 22:07 IST2025-01-07T22:06:46+5:302025-01-07T22:07:34+5:30
Earthquake in Tibet : तिबेटमध्ये आज सकाळी 7.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे.

तिबेटमध्ये हाहाकार; भूकंपामुळे 3 तासांत 50 वेळा हादरली पृथ्वी, 1000 घरे जमीनदोस्त...
Earthquake in Tibet : भारताच्या शेजारील तिबेटमध्ये आज भीषण भूकंप आला, ज्यात 100 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. या भूकंपाचे केंद्र हजारो फूट उंचीवर असलेल्या टिंगरी गावात 10 किलोमीटर खोलीवर होते. या गावाला एव्हरेस्ट प्रदेशाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार मानले जाते. हे गाव माउंट एव्हरेस्टपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे, या भागात 3 तासांच्या कालावधीत 50 हादरे बसले आहेत.
आज सकाळी 9.15 वाजता नोंदवण्यात आलेल्या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल इतकी होती. यानंतर 3 तासांत 50 आफ्टरशॉक नोंदवले गेले, त्यापैकी अनेक धक्क्यांची तीव्रता 4.4 होती. यामुळे टिंगरी व परिसरातील शेकडो घरे उद्ध्वस्त झाली. तिबेट हा जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश आहे. हा पृष्ठभागापासून 13000-16000 फूट उंचीवर आहे. डोंगराळ भाग असल्याने या भागात मोठी हानी झाली आहे.
1000 घरे उद्ध्वस्त
भूकंपाच्या केंद्रापासून 20 किलोमीटरच्या परिघात 27 गावे आहेत, जिथे 7000 पेक्षा कमी लोकसंख्या आहे. चिनी मीडियाच्या वृत्तानुसार, या भागात 1000 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बचाव पथक आजूबाजूच्या गावातही बचाव कार्य करत आहे, जेणेकरून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवता येईल. कोसळलेल्या इमारती, उद्ध्वस्त रस्ते आणि गाड्या सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये दिसत आहेत.
ल्हासा ब्लॉकमध्ये 75 वर्षांत 21 वेळा भूकंप
चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, तिबेटच्या टिंगरीमध्ये भूकंप हा ल्हासा ब्लॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात असलेल्या एका क्रॅकमुळे झाला, जो उत्तर-दक्षिण दाब आणि पश्चिम-पूर्व दाबामुळे होतो. उदाहरणार्थ, 1950 पासून आतापर्यंत या ल्हासा ब्लॉकमध्ये 6 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे 21 भूकंप नोंदवले गेले आहेत. भूकंपानंतर, माउंट एव्हरेस्टकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.
भूकंपप्रवण क्षेत्रात चीनचे धरण
ल्हासा ब्लॉकमधील सर्वात मोठा भूकंप 2017 मध्ये तिबेटच्या मेनलिंग भागात 6.9 तीव्रतेचा झाला होता, जिथे चीन सध्या वीज निर्मितीसाठी जगातील सर्वात मोठे धरण बांधत आहे. मेनलिंग हे तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीच्या (ब्रह्मपुत्रा नदी) खालच्या भागात आहे, जिथे चीनचा जलविद्युत धरण प्रकल्प सुरू आहे. चीनच्या जगातील सर्वात मोठ्या प्रकल्पामुळे या भागात भूकंप आणि पूर होण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.