'टाइम'च्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये विराट कोहली, दीपिका पादुकोण व नडेला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 08:52 AM2018-04-20T08:52:48+5:302018-04-20T09:08:37+5:30
'टाइम' मॅगझिनने जाहीर केलेल्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतातील सेलिब्रिटींच्या नावाचाही समावेश आहे.
मुंबई : 'टाइम' मॅगझिनने जाहीर केलेल्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतातील सेलिब्रिटींच्या नावाचाही समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, अभिनेत्री दीपिका पादुकोण, ओला कंपनीचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल, भारतात जन्मलेले मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांचा समावेश आहे. टाइम मॅगझिनने जाहीर केलेल्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड टॅम्प, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन, जपानचे पंतप्रधान शिंजो अबे, बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, यंदाही या यादीतून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान देण्यात आलेले नाही. नरेंद्र मोदींचे नाव 2015 च्या यादीत होते.
दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'टाइम'मध्ये आपला अभिप्राय नोंदवला असून त्यात विराट कोहलीचे भरभरून कौतुक केले आहे. 2008 मध्ये 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना मी विराटला पाहिले. त्याच्यामध्ये असलेली धावांची भूक आणि खेळातले सातत्य यामुळे त्याने आपली एक स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आज विराट प्रत्येक घरात पोहोचला आहे. क्रिकेटमधील तो एक चॅम्पियन खेळाडू बनला आहे, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचे कौतुक केले आहे.
तर, अभिनेत्री दीपिका पादुकोणबाबत हॉलिवडूचा अभिनेता विन डिजेलने सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये दीपिका पादुकोण फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे, असे म्हटले आहे. त्याचबरोबर, भाविश अग्रवाल यांच्यातील जिद्द, दृढनिश्चय, दूरदृष्टीचा उल्लेख करत फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी त्यांचा गौरव केला आहे.