तिन यॉ यांची म्यानमारच्या अध्यक्षपदी निवड
By admin | Published: March 15, 2016 01:41 PM2016-03-15T13:41:03+5:302016-03-15T13:41:29+5:30
म्यानमारच्या अध्यक्षपदी आँग सान सू की यांचा माजी वाहनचालक व अत्यंत विश्वासू तिन यॉ यांची निवड, 50 वर्षात प्रथमच एक सामान्य नागरिक म्यानमारचं अध्यक्षपद भुषवणार
Next
>ऑनलाइन लोकमत -
नैपिद्वा, दि. १५ - म्यानमारच्या अध्यक्षपदी आँग सान सू की यांचा माजी वाहनचालक व अत्यंत विश्वासू तिन यॉ यांची निवड झाली आहे. देशाच्या इतिहासातील ही एक महत्वाची घटना आहे. 50 वर्षात प्रथमच एक सामान्य नागरिक म्यानमारचं अध्यक्षपद भुषवणार आहे.
तिन यॉ यांना 652 पैकी 360 मतं मिळाली. सू की यांनी गुरुवारी यॉ यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर केले होते. मंगळवारी तिन यॉ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. तिन यॉ यांची निवड झाल्यानंतर खासदारांनी देखील टाळ्या वाजवून या निर्णयाचं स्वागत केलं.
आँग सान सू की विवाहित असल्याने तसंच त्यांचे दिवंगत पती आणि दोन मुले ही ब्रिटिश असल्याने त्यांना अध्यक्षपदी राहता येणं शक्य नव्हतं. म्यानमारची घटना लष्कराने लिहिली असून देशाचे सर्वोच्च पद ज्याचे जवळचे नातेवाईक विदेशी आहेत त्याला भूषविता येत नाही, अशी तरतूद त्यात आहे. सू की यांच्या पक्षाला बहुमत असल्यामुळे यॉ निवडून येण्यात अडचण येणार नाही हे नक्की होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे.आँग सान सू की यांच्याकडे काही हक्क नसतील मात्र त्यांचं पद अध्यक्षापेक्षा मोठं असेल असं तिन यॉ यांनी सांगितलं होतं.