पाकमध्ये सरकारविरुद्ध आज इन्कलाब मार्च
By admin | Published: August 14, 2014 01:58 AM2014-08-14T01:58:14+5:302014-08-14T01:58:14+5:30
इमरान खान आणि मौलाना ताहीर उल कादरी यांच्या १४ आॅगस्टच्या नियोजित विशाल रॅलीच्या घोषणेनंतर नवाज शरीफ सरकारने संघर्ष टाळण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न सुरू केले आहेत
इस्लामाबाद : इमरान खान आणि मौलाना ताहीर उल कादरी यांच्या १४ आॅगस्टच्या नियोजित विशाल रॅलीच्या घोषणेनंतर नवाज शरीफ सरकारने संघर्ष टाळण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न सुरू केले आहेत. याचवेळी सरकारने पाकिस्तानला सोमालिया, इराक किंवा लिबिया होऊ देणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
कॅनडात वास्तव्य करणारे मौलाना कादरी गुरुवारी नवाज शरीफ सरकारला बरखास्त करण्याच्या मागणीसाठी ‘इन्कलाब मार्च’ काढतील. भ्रष्टाचारात बुडालेले शरीफ सरकार गरिबांविरुद्ध धोरणे राबवीत असल्याचा मौलाना कादरी यांचा आरोप आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्रालयाने बैठक घेतली. तीत निदर्शक हिंसाचार करीत असतील तर तो कठोरपणे मोडून काढला जाईल, असा निर्णय झाला.
गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी म्हटले आहे की, जे लोक पोलिसांना दुबळे करीत आहेत, आपल्याच लोकांना हुतात्मा करीत आहेत आणि आपल्याच लोकांची डोकी कापत असतील, तर त्यांना इस्लामाबादेत मोकळे सोडले जाणार नाही.’ कोणत्याही हिंसक जमावाला इस्लामाबादेत निदर्शने करण्याची परवानगी दिली गेली, तर काही महिन्यांनी आणखी हिंसक लोक इस्लामाबादेत येऊन सरकारला नियंत्रणात ठेवण्याची धमकी देतील. या गोष्टींना कधीही परवानगी दिली जाऊ शकत नाही, कारण आम्ही पाकिस्तानची अवस्था सोमालिया, इराक किंवा लिबियासारखी
होऊ देणार नाही, असेही चौधरी म्हणाले.
पाकिस्तान सरकारने याआधीच इस्लामाबादची पूर्ण सुरक्षा तीन महिन्यांसाठी लष्कराच्या हवाली केली आहे. लष्कराचे जवान सरकारी कार्यालये आणि अन्य संवेदनशील ठिकाणांचे रक्षण करतील, शिवाय सरकारने इस्लामाबादेतील अनेक भागांतील मोबाईल किंवा वायरलेस सेवा बेमुदत काळासाठी निलंबित करण्याचे आदेश आधीच दिले आहेत. याच बरोबर नियोजित मार्च रद्द व्हावा यासाठी सरकार इमरान खान यांच्याशी संपर्क साधत आहे. (वृत्तसंस्था)