आज मध्यरात्री दिवस एका ‘लीप’ सेकंदाने लांबणार
By admin | Published: June 30, 2015 01:55 AM2015-06-30T01:55:00+5:302015-06-30T01:55:00+5:30
यंदा ३० जून रोजीचा दिवस अधिकृतरीत्या नेहमीपेक्षा थोडा लांब असेल. कारण या दिवसात एक अतिरिक्त सेकंद वा ‘लीप’ सेकंदाचा समावेश होणार आहे.
वॉशिंग्टन : यंदा ३० जून रोजीचा दिवस अधिकृतरीत्या नेहमीपेक्षा थोडा लांब असेल. कारण या दिवसात एक अतिरिक्त सेकंद वा ‘लीप’ सेकंदाचा समावेश होणार आहे.
ग्रीनबेल्ट येथील नासाच्या गोड्डार्ड अंतराळ प्रक्षेपण केंद्राचे डॅनियल मॅकमिलन यांनी सांगितले की, ‘‘पृथ्वीला स्वत:भोवती फिरण्याची गती दिवसेंदिवस कमी होत आहे. पृथ्वीच्या परिवलन गतीचे गणित जुळविण्यासाठी ‘लीप’ सेकंदाचा समावेश करण्यात येणार आहे.’’ एका दिवसात ८६,४०० सेकंद असतात.
प्रमाण वेळेनुसार, लोक आपल्या दैनंदिन जीवनात याचा समन्वित जागतिक वेळेच्या रूपात वापर करतात. ‘कोआॅर्डिनेटेड युनिव्हर्सल टाईम’ची (यूटीसी) आण्विक कालगणनेशी जुळणी करण्यासाठी असा जास्तीचा एक सेकंद घ्यावा लागतो. त्यामुळे ३० जूनचा दिवस ८६,४०० सेकंदांऐवजी ८६,४०१ सेकंदांचा असेल. तथापि, एका सरासरी दिवसात ८६,४००.०२ सेकंद होतात. पृथ्वीला स्वत:भोवती फिरण्यासाठी एवढाच वेळ लागतो. सामान्यत: एक लीप सेकंद ३० जून वा ३१ डिसेंबर रोजी समाविष्ट होतो. १९७२ मध्ये सर्वप्रथम लीप सेकंदाचा वापर करण्यात आला होता.
अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सॉफ्टवेअर कंपन्या सज्ज
-सामान्यत: घड्याळीमध्ये २३:५९:५९ नंतर येत्या दिवशी ००:००:०० वाजतात. मात्र ३० जून रोजी एक सेकंद नव्याने सामील झाल्यानंतर ते २३:५९:५९ नंतर २३:५९:६० होतील आणि पुन्हा एक जुलै रोजी ००:००:०० वाजतील.
-अनेक यंत्रणा एक सेकंदासाठी बंद केल्या जातील. यामुळे येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी जगभरातील सॉफ्टवेअर कंपन्यांनी तयारी सुरू केली आहे.
-अशाच प्रकारे याआधी २०१२ मध्ये घड्याळी वेळेत एक सेकंद वाढविला गेला तेव्हा अनेक कंपन्यांची यंत्रणा कोलमडली होती व खासकरून जावा स्क्रीप्टमधील सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या, असे वृत्त ‘दि टेलिग्राफ’ दैनिकाने दिले आहे.