टायटॅनिकच्या जलसमाधीला आज १०४ वर्ष पूर्ण
By admin | Published: April 14, 2016 01:13 PM2016-04-14T13:13:02+5:302016-04-14T13:13:02+5:30
१९२० च्या दशकातील जगातील सर्वात मोठे आणि आलिशान जहाज टायटॅनिकला १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली होती.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १४ - टायटॅनिक दुर्घटनेला आज १०४ वर्ष पूर्ण झाली. १९२० च्या दशकातील जगातील सर्वात मोठे आणि आलिशान जहाज टायटॅनिकला १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली होती. त्याकाळातील टायटॅनिक भव्य आणि आलिशान जहाज होते. आपल्या पहिल्याच प्रवासात टायटॅनिकला जलसमाधी मिळाली होती.
बुडू न शकणारे जहाज असा टायटॅनिकचा त्यावेळी प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे पहिल्याच प्रवासात टायटॅनिकला जलसमाधी मिळाल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. उत्तर अटलांटिक महासागरातील एका हिमनगाला धडक बसल्यानंतर महासागराचे पाणी जहाजात शिरण्यास सुरुवात झाली आणि दोन तास ४० मिनिटात या महाकाय जहाजाला समुद्राच्या पोटात कायमची चिरनिद्रा मिळाली.
एकूण २२०० प्रवासी आणि क्रू सदस्य या बोटीमध्ये होते. अपु-या लाईफ बोटच्या संख्येमुळे १५०० प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. १० एप्रिलला टायटॅनिक आपल्या पहिल्याच प्रवासासाठी इंग्लंडच्या साऊथम्पटॉन बंदरातून निघाली. फ्रान्सच्या चेरबोर्ग आणि आयर्लंडच्या क्वीन्सटाऊन येथून काही शेवटच्या प्रवाशांना जहाजामध्ये घेतल्यानंतर टायटॅनिक पूर्ण वेगाने अमेरिकेतील न्यूयॉर्क बंदराच्या दिशेने निघाले होते.
मात्र वाटेत उत्तर अटलांटिक महासागरातील हिमनगाला जहाजाची धडक बसली आणि टायटॅनिक इतिहासजमा झाले. शेवटच्या क्षणी कॅप्टनने हिमनगाशी धडक टाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र अपघात टळला नाही. टायटॅनिकमध्ये एकूण १६ कक्ष होते. विलियम पीरी यांनी टायटॅनिकचे डिझाईन बनवले होते.