CoronaVirus: शंभरीच्या उंबरठ्यावर बागेला १०० फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 03:38 AM2020-04-22T03:38:39+5:302020-04-22T03:38:58+5:30
कोरोनाच्या संसर्गात आघाडीवर लढणाऱ्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ या आरोग्य केंद्रासाठी आपण निधी उभारावा असं त्यांना मनापासून वाटलं. लोकांनी हा निधी उभारण्यास पुढे येण्यासाठी ९९ वर्षीय मुरे यांनी स्वत:लाच आव्हान दिलं.
ब्रिटन
देशाची सेवा करण्यास वयाची अट नसते हे लंडन येथील ९९ वर्षांच्या टॉम मुरे यांनी दाखवून दिलं आहे. लंडन येथील ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ हे ब्रिटन सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्रासाठी टॉम मुरे यांनी १००० पौंडापेक्षाही अधिक निधी उभा करून दिला.
टॉम मुरे हे ब्रिटन सैन्यातील निवृत्त अधिकारी. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी भारत, बर्मा आणि सुमात्रा याठिकाणी त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं होतं, पण देशासाठी सज्ज असण्याचं हेच कर्तव्य निवृत्त होऊनही ते विसरू शकले नाहीत. म्हणूनच कोरोनाच्या संसर्गात आघाडीवर लढणाऱ्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ या आरोग्य केंद्रासाठी आपण निधी उभारावा असं त्यांना मनापासून वाटलं. लोकांनी हा निधी उभारण्यास पुढे येण्यासाठी ९९ वर्षीय मुरे यांनी स्वत:लाच आव्हान दिलं. बेडफोर्डशायर येथील आपल्या घराच्या आवारातील २५ मीटर बागेला १०० फेऱ्या घालण्याचं आव्हान त्यांनी स्वत:समोर ठेवलं. मागच्या गुरुवारी त्यांनी हे आव्हान पूर्ण केलं.
लंडनमधील लोकांना कॅप्टन मुरे यांनी सैन्यात असताना केलेला पराक्रम माहीत होता आणि आताही ते जो पराक्रम करू पाहात होते त्याबद्दलही लोकांना आदर होता. त्या आदरापोटीच मुरे यांनी स्वत:ला दिलेल्या आव्हानाला लोकांनी निधी उभारून साथ दिली. कमरेचं हाड मोडल्यामुळे वॉकरच्या साहाय्यानं चालणाऱ्या ९९ वर्षीय मुरे यांच्यासाठी २५ मीटर बागेला १०० फेºया घालणं हे पर्वताएवढं आव्हान होतं, पण हे आव्हान त्यांना ३० एप्रिलच्या आत पूर्ण करायचं होतं. कारण ३० एप्रिलला मुरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यापूर्वी लोकांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसप्रती त्यांना निधी उभारून कृतज्ञता व्यक्त करायची होती.
टॉम मुरे यांनी मागील गुरुवारी हे आव्हान पूर्ण केलं आणि संपूर्ण ब्रिटनमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मुरे यांच्या पुढाकारातून एक कोटी पौंडापेक्षाही जास्त निधी उभा राहिला. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचा नातू युवराज विल्यम यांनीही मुरे यांच्या धाडसाचं ‘अब्सोल्यूट लिजंड’ या शब्दांनी गौरव केला. टॉम मुरे यांनी त्यांच्या कृतीतून ब्रिटनमधील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा दिली असल्याचं युवराज विल्यम म्हणतात.
मुरे यांनी निवृत्तीच्या काळात केलेली ही देशसेवाच आहे म्हणून आज संपूर्ण ब्रिटनमधून टॉम यांना ‘सर’ ही पदवी मिळण्याची मागणी होत आहे, पण स्वत: मुरे मात्र हे सर्व हसण्यावारी नेतात. अशी पदवी मिळाली तर ते माझ्यासाठी आश्चर्यच असेल, पण मी त्यासाठी हे केलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ हीच मुरे यांच्या वॉकमागची प्रेरणा. या आरोग्य केंद्रानेच त्यांच्या तुटलेल्या कमरेच्या हाडावर शस्त्रक्रिया केली. याच आरोग्य केंद्रात त्यांना कॅन्सर झाला असता उपचार झाले. त्यामुळे या आरोग्य केंद्राबद्दल त्यांना विशेष प्रेम. त्यातच कोरोनाकाळात हीच आरोग्य संस्था दिवसरात्र झटते आहे. म्हणून तिला मदत करण्याचे मुरे यांना मनापासून वाटत होते.
टॉम मुरे म्हणतात, ‘आपल्या देशावर हे चिंतेचे ढग आहेत. ते एक दिवस विरून जातील. पुन्हा आकाश स्वच्छ होईल. नक्कीच उद्याचा दिवस चांगला असेल.’ आज टॉम यांचे हे प्रेरणादायी शब्द त्यांच्या कृतीप्रमाणे प्रत्येकात आशावाद निर्माण करत आहेत.