पाकमध्ये विरोधाचा सूर कायम मात्र चर्चा यशस्वी होण्याची चिन्हे
By admin | Published: September 9, 2014 04:17 AM2014-09-09T04:17:14+5:302014-09-09T04:17:14+5:30
पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर इम्रान खान अडून बसल्याने पाकमध्ये विरोधाचा सूर टिकून असला तरी सरकार व आंदोलनकर्त्यांमधील चर्चा सफल होत असल्याचे सांगितले जात आहे.
इस्लामाबाद: पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर इम्रान खान अडून बसल्याने पाकमध्ये विरोधाचा सूर टिकून असला तरी सरकार व आंदोलनकर्त्यांमधील चर्चा सफल होत असल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तान तहरीक ए इन्साफचे (पीटीआय) प्रमुख असलेल्या इम्रान खान यांनी संसदेबाहेर आपल्या सर्मथकांशी बोलताना, जोपर्यंत पंतप्रधानांना राजीनाम्यासाठी राजी करीत नाही तोपर्यंत आपण परत जाणार नाही असे जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या अनुयायांना दोन आठवडे धरणे देण्यास सांगितले आहे.पाकिस्तान अवामी तहरीक (पीएटी)चे मौलवी तहिरुल कादरी हेही खान यांच्या शिबिराजवळच आपली निदर्शने करीत आहेत. त्यांच्या सर्मथकांनी संसदेचा पार्किंग भाग रिकामा केला असून ते कॉन्स्टिट्यूशन एव्हेन्यूजवळ धरणे देत आहेत. सरकार व पीटीआयदरम्यानच्या चर्चेचा एक टप्पा रविवारी येथे पार पडला.
या चर्चेत सकारात्मक बोलणी झाल्याचे सांगून अन्य काही महत्त्वाच्या मुद्यांवर बोलणी होणे व त्यांचे समाधान होणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले. देशात उमटत असलेल्या विरोधाच्या सुरापासून देशाला सुरक्षित राखण्याबाबत दोन्ही पक्ष गांभीर्याने विचार करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सरकार पक्षाचे नेतृत्व करणारे अर्थमंत्री इसहाक डार यांनी, अन्य मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा बैठक बोलावणार असल्याचे सांगितले. इम्रान खान यांनी सरकारवर आपला हल्ला चालूच ठेवीत, मागील निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यातील लाभार्थी असल्याचा आरोप अनेक नेत्यांवर केला. त्यांनी बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री डॉ. अब्दुल मलिकसह अन्य नेते या घोटाळ्यात सामील असल्याचे म्हटले. पाकमध्ये मलिक यांची गणना एका स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांमध्ये केली जाते. दोन आठवडे निदर्शने करण्याचा इम्रान खान यांचा आदेश अशा वेळी आला आहे जेव्हा त्यावर सर्व बाजूंनी टीका होते आहे व दुसरीकडे देश आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा पुराच्या संकटाला तोंड देत आहे.