श्वास घ्यायला अडचण होत होती म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे पाहुन डॉक्टर झाले शॉक!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 01:10 PM2022-02-23T13:10:34+5:302022-02-23T13:14:33+5:30
एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं, जे अतिशय विचित्र होतं. एका व्यक्तीच्या चक्क नाकामध्ये दात उगवला होता (Tooth Growing in Nose), हे पाहून डॉक्टरही हैराण झाले.
मानवी शरीर अतिशय गुंतागुंतीचं असतं. यात अनेकदा अशा काही अजब गोष्टी आढळतात ज्या त्या ठराविक व्यक्तीसाठी मोठी समस्या बनतात, तर जगासाठी चमत्कार. शरीराबाबत अनेक अशा गोष्टी आहेत ज्या पूर्णपणे समजून घेणं किंवा त्यांचं उत्तर शोधणं कठीण आहे. नुकतंच एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं, जे अतिशय विचित्र होतं. एका व्यक्तीच्या चक्क नाकामध्ये दात उगवला होता (Tooth Growing in Nose), हे पाहून डॉक्टरही हैराण झाले.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये डॉ. सागर खन्ना आणि डॉ. मायकल टर्नर यांनी नुकतंच या केसवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जर्नलमधील माहितीनुसार, एका व्यक्तीने क्लिनिकमध्ये सांगितलं की त्याला बऱ्याच काळापासून नाकाने श्वास घेण्यास त्रास होत होता. ३८ वर्षीय या व्यक्तीची टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला deviated septum ची समस्या असल्याचं सांगितलं. सोप्या शब्दात सांगायचं झाल्याचं या व्यक्तीच्या दोन नाकपुड्यांमधील भाग वाकडा होता. यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता.
डॉक्टरांनी या व्यक्तीची rhinoscopy केली आणि रिपोर्ट पाहून तेदेखील थक्क झाले. रायनोस्कोपी ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात रुग्णाच्या नाकाची तपासणी करण्याकरता त्यात एक ट्यूब टाकली जाते. ट्यूबमध्ये कॅमेरा लावल्यानंतर समजलं की या व्यक्तीच्या नाकाच्या आतमध्ये एक पांढऱ्या रंगाचा अवयव वाढत आहे. तपासात समजलं की तो एक अॅक्टोपिक दात आहे. अॅक्टोपिक दात म्हणजे चुकीच्या ठिकाणी उगवलेला दात. ही अतिशय दुर्मिळ स्थिती असते.
जर्नलमध्ये सांगितलं गेलं की दात ओरल आणि ओटोलॅरिनगॉलोगिक सर्जरीच्या माध्यमातून काढण्यात आला (Doctors Removed Tooth from Nose). याची लांबी १४ मिलीमीटर होती. सर्जरीनंतर तीन महिन्यांनी रुग्णाला चेकअपसाठी बोलावलं असता समजलं की त्याची श्वास घेण्यात येणारी समस्याही बंद झाली आहे. रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं की अनेकदा दात व्यवस्थित उगवत नाहीत आणि ते जबड्यातच रोवले जातात. त्यामुळे ते वेगळ्याच दिशेने उगवू लागतात आणि याच परिस्थितीत या व्यक्तीप्रमाणे अवस्था होते.