पाकिस्तानमधील टॉप 6 दहशतवादी संघटना
By Admin | Published: June 9, 2016 12:34 PM2016-06-09T12:34:12+5:302016-06-09T12:38:50+5:30
दहशतवादी हल्ले होऊनही पाकिस्तान आपल्या देशातील दहशतवादी संघटनांविरुध्द कडक पावले उचलताना दिसत नाही, पाकिस्तानमधील टॉप सहा दहशतवादी संघटनांबद्दल जाणून घेऊया...
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 08 - पाकिस्तानामधील मुख्य समस्या म्हणजे दहशतवाद. पाकिस्तानने पोसलेला दहशतवाद आज त्यांच्याचविरोधातच उभा आहे. मात्र अजूनही पाकिस्तान दहशतवादाविरोधात कारवाई करताना दिसत नाही. अनेक दहशतवादी हल्ले होऊनही पाकिस्तान आपल्या देशातील दहशतवादी संघटनांविरुध्द कडक पावले उचलताना दिसत नाही. यानिमित्ताने पाकिस्तानमधील टॉप सहा दहशतवादी संघटनांबद्दल जाणून घेऊया...
1) तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान(टीटीपी)
पश्तो शब्द तालिबनपासून तालिबान हा शब्द बनला आहे. त्याचा अर्थ विद्यार्थी असा होतो. तालिबान अफगाणिस्तानमधील कट्टर इस्लामी राजकीय आंदोलन आहे. ती 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तानमध्ये सत्तेत होते. 9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करुन तालिबानला सत्तेवरुन पाय उतार केले. सत्तेत असताना त्यांनी कट्टर शरिया कायदे लागू केले होते. 16 डिसेंबर, 2014 रोजी पेशावरमधील लष्करी शाळेवर हल्ला करुन टीटीपी प्रकाशझोतात आली होती. या हल्ल्यात 132 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता. यानंतर पाकिस्तान सरकारने या संघटनेच्या दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
उद्देश काय ?
पाकिस्तानात शरियावर आधारित इस्लामी कायदे लागू करण्याचा टीटीपीचा उद्धेश आहे. 2007 मध्ये 13 दहशतवादी संघटनांनी मिळून तिची स्थापना केली होती. पाकिस्तानच्या बैतुल्ला महसूद नावाच्या कुविख्यात दहशतवाद्याने टीटीपीची स्थापना केली होती. टीटीटीचे तळ पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील आदिवासी भागात आहे.
पाकिस्तानवरोधात नाराजी
दहशतवादी संघटनांचा कल पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका राहिली आहे. मात्र टीटीपीचा या देशाबाबत जहाल भूमिका राहिली आहे. वास्तविक टीटीपीला वाटते, की पाकिस्तान अमेरिकेचा गुलाम आहे. येथील नेते देशाचे आरोपी आहेत. याच कारणामुळे ही दहशतवादी संघटना पाकिस्तान नेत्यांचा शत्रू क्रमांक एक आहे. त्यांचा म्होरक्या हकीमुल्ला मसूदच्या मृत्यूच्या बदल्यात पाकिस्तानी नेत्यांना अमेरिकेकडून 5 कोटी डॉलर रुपये मिळाले होते. वझीरिस्तानमध्ये या दहशतवादी संघटनेची पळेमुळे वाढली असून ते संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचे मानले जाते.
2) जमात-उद-दावा
हाफीज सईद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या जमात-उद-दावाला(जेयूडी) विदेश दहशतवादी संघटन म्हणून घोषित केले. हाफीज सईद 26/11 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. 2008 मध्ये संयुक्त राष्ट्राने सईदला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. दुसरीकडे अमेरिकेने त्याच्यावर 1 कोटी बक्षीस ठेवले आहे. ही संघटना पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैय्यबा या दुस-या दहशतवादी संघटनेशी जोडली गेली आहे.
3) लष्कर-ए-तैयबा (एलईटी)
या दहशतवादी संघटनेचा प्रमुखदेखील हाफिज सईदच आहे. लष्कर ए तैयबाला (एलईटी) भारतविरोधी कारवायांसाठी ओळखले जाते. भारताविरोधी कारवाया करत असल्यामुळे पाकिस्तान गुप्तहेर संघटना आयएसआयचाही त्यांना पाठिंबा मिळत असल्याचा दावा वारंवार करण्यात आला आहे. 1990 मध्ये काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि शेकडो काश्मीरी पंडितांच्या हत्येमागे लष्करचा हात आहे. हाफिज 2001 मधील भारतीय संसदेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. या व्यतिरिक्त हाफिज 11 जुलै, 2006 आणि 2008 मध्ये मुंबई हल्ल्यांचाही आरोपी आहे.
4) जैश-ए-मोहम्मद
मौलाना मसूद अझहर हा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. नुकतंचं जानेवारीमध्ये पठाणकोट एअर बेसवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागे मसूद अझहरचा हात आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनीच हा हल्ला केला होता. अझहरने काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाशी दोन हात करण्यासाठी जैश ए मोहम्मद या संघटनेची स्थापना केली.पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय जैशच्या म्होरक्यांना मदत करत असल्याचाही आरोप केला जातो. 2001 मधील संसदेवरील हल्ल्यातील अझहर प्रमुख संशयित होता. त्यावेळी पाकिस्तानने अझहरविरुध्द कारवाई करण्यास आणि भारताला सोपवण्यास नकार दिला होता.
पाकिस्तानी लष्कर अझहर सारख्या दहशतवाद्यांचा भारताविरोधात वापर करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करणं शक्य होत नाही. त्यांना कट्टरवादी म्हणून सादर केलं जात. यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येणं शक्य होत नाही.
5) अल बद्र
पाकिस्तान येथील ही दहशतवादी संघटना भारताविरुध्द विशेषत: जम्मू-काश्मीरमधील कारवायांमध्ये सहभागी असते. अर्फीन भाई हा या संघटनेचा म्होरक्या आहे. हिजबूल मुजाहिदीनपासून वेगळे होऊन हा गट तयार झाल्याचे सांगितले जाते. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय तिला वित्तीय मदत करते. या व्यतिरिक्त आयएसआय तिचा वापर भारतीय हवाई दलासह छुपे युध्द करते.
6) हरकत उल जिहाद अल इस्लामी (हुजी)
ही दहशतवादी संघटना 1990 पासून पाकिस्तान, बांगलादेश आणि विशेषत: भारतात सक्रिय आहे. इलियासी कश्मीरी हा या दहशतवादी संघटनेचा मोहिम प्रमुख होता. 4 जून, 2011 रोजी दक्षिण वजीरिस्तानमध्ये तो अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्या तो मारला गेला. 2006 मधील वाराणसी स्फोटामागेही हुजीचा हात होता. या व्यतिरिक्त पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटामध्येही तिने घडवून आणले होते. 2011 दिल्ली उच्च न्यायालय स्फोटातही ती संशयित संघटना होती.