टॉपलेस ‘मिस युनिव्हर्स इंडोनेशिया’ स्पर्धा! ट्रम्प यांचाही संबंध!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 01:19 PM2023-08-11T13:19:41+5:302023-08-11T13:21:54+5:30

सौंदर्याची बाजारपेठ संपूर्ण जगभर आणि खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. त्यात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल  होते. सौंदर्य स्पर्धा हा त्यातला केवळ एक छोटासा हिस्सा.

Topless 'Miss Universe Indonesia' competition! Trump is also related! | टॉपलेस ‘मिस युनिव्हर्स इंडोनेशिया’ स्पर्धा! ट्रम्प यांचाही संबंध!

टॉपलेस ‘मिस युनिव्हर्स इंडोनेशिया’ स्पर्धा! ट्रम्प यांचाही संबंध!

googlenewsNext

यावेळची ‘मिस युनिव्हर्सइंडोनेशिया’ स्पर्धा मुथिया रेचमन या तरुणीनं जिंकली आहे. या वर्षीच्या अखेरीस साल्वाडोर येथे होणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स २०२३’ या स्पर्धेत मुथिया आता इंडोनेशियाचं प्रतिनिधित्व करेल. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कंपनीही या सौंदर्य स्पर्धांशी निगडित आहे. १९९६ ते २००२ या काळात ट्रम्प यांच्या कंपनीनं या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. १९५२ मध्ये पहिल्यांदा ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा घेण्यात आली होती.

सौंदर्याची बाजारपेठ संपूर्ण जगभर आणि खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. त्यात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल  होते. सौंदर्य स्पर्धा हा त्यातला केवळ एक छोटासा हिस्सा. पण त्यातही किती पैशांची उलाढाल होते हे पाहिलं तर सर्वसामान्यांचे डोळे चक्रावतील. पण त्यातही मुख्य बाब म्हणजे ‘मिस युनिव्हर्स’, ‘मिस वर्ल्ड’ यासारख्या जागतिक पातळीवर मान्यता पावलेल्या स्पर्धा. जगभरातल्या केवळ स्पर्धकांनाच नाही, तर संपूर्ण  सर्वसामान्य प्रेक्षकांनाही या स्पर्धेबद्दल अतीव उत्सुकता असते. 
या स्पर्धांसाठी पात्रता फेरी असते. अगोदर त्या त्या देशाच्या पातळीवर या स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यातील विजेत्यांनाच जागतिक पातळीवरील स्पर्धेत भाग घेता येतो. या स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतात, स्पर्धेतील महिलांचं लैंगिक शोषण होतं, आपण ‘सुंदर’ दिसावं यासाठी ‘मेडिकल मालप्रॅक्टिसेस’ होतात, याबद्दल आजवर अनेकदा आरोप झाले आहेत. 

त्याचं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे काही वर्षांपूर्वी इक्वाडोर येथील सौंदर्य स्पर्धेतील एका १९ वर्षीय विजेतीला इतर अनेक बक्षिसांबरोबरच एक कूपनही बक्षीस देण्यात आलं होतं. काय होतं हे कूपन? - हे कूपन मिळालेल्या विजेतीला ‘फ्री सर्जरी’ करून मिळणार होती. कसली होती ही सर्जरी? - तर तुमच्या कंबरेचा घेर चक्क एक इंचानं कमी करून देणारी! ही शस्त्रक्रिया करवून घ्यावी, यासाठी विजेत्या तरुणीवर दबाब टाकण्यात आला. शेवटी तिनंही ही सर्जरी करवून घेण्याचं ठरवलं आणि त्यातच तिचा अंत झाला!

काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे ‘मिस युनिव्हर्स इंडोनेशिया’ ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत जे काही झालं, त्यावरून सध्या संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. २९ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान या स्पर्धेच्या विविध फेऱ्या पार पडल्या. ३ ऑगस्ट रोजी या स्पर्धेची फायनल होती. त्याच्या तीन दिवस आधी या स्पर्धेतील सुंदरी खरंच स्पर्धेसाठी लायक आहेत की नाहीत, यासाठी त्यांचं ‘बाॅडी चेकअप’ करण्यात आलं. आता हे बॉडी चेकअप म्हणजे तरी काय? - तर त्यांच्या शरीरावर काही चट्टे वगैरे आहेत का, आपल्या शरीरावर त्यांनी टॅटू वगैरे गोंदवले आहेत का, त्वचेखाली असलेल्या चरबीमुळे त्यांच्या त्वचेला (विशेषत: मांड्या आणि नितंब) मंदपणा आला आहे का, त्वचा निस्तेज झाली आहे का, याची ‘तपासणी’ करण्यात आली. 

त्यासाठी या स्पर्धक तरुणींना एका वेगळ्या दालनात नेण्यात आलं आणि तिथे त्यांना ‘टॉपलेस’ होण्यास सांगण्यात आलं. या दालनात सुमारे वीस जण होते आणि त्यात बहुतांश पुरुष होते! शिवाय दारही अर्धवट उघडंच होतं. याच प्रकारामुळे सध्या इंडोनेशिया आणि जगभरात मोठी खळबळ माजली आहे. 
या स्पर्धेतील सहा तरुणींनी पुढे येऊन यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रारही केली आहे. ही आणखी एक मोठी आणि महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. लोकसंख्येच्या बाबतीत इंडोनेशिया हा जगातला चौथ्या क्रमांकाचा देश आहे.  अनेक धार्मिक संघटनांचा या सौंदर्य स्पर्धांना विरोध आहे आणि याबाबत वारंवार निदर्शनंही केली जातात. २०१३ मध्ये झालेल्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत व्यासपीठावर मुख्यत: मुस्लीम देशांच्या तरुणी असल्यानं त्यावेळी ‘बिकिनी राऊंड’ रद्द करण्यात आला होता. 

‘मिस युनिव्हर्स इंडोनेशिया’ या स्पर्धेत भाग घेतलेली आणि ज्यांना ‘टॉपलेस’ होण्याची सक्ती करण्यात आली, त्यातली एक तरुणी व्यथित होऊन सांगते, या घटनेनंतर मी अतिशय अस्वस्थ आहे. माझी मन:स्थिती बिघडली आहे. गेले काही दिवस मी झोपलेली नाही. रात्रीही मी टक्क जागीच असते!” -  स्पर्धेतील या घटनेचे व्हिडीओही लीक झाले असून स्थानिक वाहिन्यांनी या सुंदऱ्यांचे चेहरे ब्लर करून ते ब्रॉडकास्ट केले आहेत. 

स्पर्धेतील तीन पीडित तरुणींचं वकीलपत्र घेतलेल्या ॲड. मेलिसा अंग्राएनी म्हणतात, हा अतिशय गंभीर प्रकार आहे आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ स्पर्धेतील आणखीही तरुणी लवकरच पुढे येतील. पोलिसांनी आणि या “तपासणी”च्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या एका महिलेनंही या घटनेची पुष्टी केली आहे. प्रत्यक्ष संयोजकांनी मात्र याबाबत अजून तोंड उघडलेलं नाही.

Web Title: Topless 'Miss Universe Indonesia' competition! Trump is also related!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.