विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 03:20 PM2024-11-15T15:20:56+5:302024-11-15T15:23:03+5:30
महिला खासदाराने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
New Zealand Haka Dance Video : न्यूझीलंडच्यासंसदेत गुरुवारी (14 नोव्हेंबर 2024) एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. आपल्या भाषणांमुळे नेहमी चर्चेत असलेली न्यूझीलंडमधील सर्वात तरुण माओरी खासदार हाना राविती करियारिकी मापी क्लार्क, हिने 'ट्रीटी प्रिन्सिपल्स' विधेयकाच्या निषेधार्थ सभागृहात आगळावेगळा आदिवासी हाका डान्स केला. यावेळी तिने भरसंसदेत या विधेयकाची प्रतही फाडली. इतर काही खासदारही तिच्या या निषेधात सहभागी झाले.
न्यूझीलंडच्या संसदेत सर्व खासदार या विधेयकावर मतदान करण्यासाठी जमले होते. यावेळी 22 वर्षीय महिला खासदाराने अधिवेशनादरम्यान बोलण्यास सुरुवात केली. बोलता बोलता तिने बिलाची एक प्रत फाडली आणि पारंपारिक हाका डान्स सुरू केला. तिला पाठिंबा देण्यासाठी संसदेतील इत खासदारांनीही तिच्यासोबत हा डान्स करत आपला विरोध दर्शवला. न्यूझीलंडमध्ये संसदेच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या या आगळ्यावेगळ्या निषेधाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
New Zealand’s youngest MP, Hana-Rawhiti Maipi-Clarke, tore a bill in Parliament and performed the haka, protesting a reinterpretation of the 1840 Treaty of Waitangi, prompting a brief suspension.#NewZealand#NewZealandParliament#hanarawhiti#maorihakapic.twitter.com/hlk06k935D
— Lokmat Times Nagpur (@LokmatTimes_ngp) November 15, 2024
या विधेयकाला विरोध का?
या विरोधाचे कारण 1840 च्या कराराशी संबंधित तत्त्वे आहेत. माओरी जमातींना ब्रिटिश शासन स्वीकारण्याच्या बदल्यात त्यांच्या जमिनी आणि अधिकारांचे संरक्षण करण्याचे वचन दिले होते. परंतु सध्याच्या विधेयकाने सर्व नागरिकांना समान तत्त्वे लागू करण्याचा प्रयत्न केला आहे, जे माओरी नेते स्वदेशी हक्कांचे उल्लंघन मानतात. दरम्यान, महिला खासदाराच्या निषेधानंतर संसदेत प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभापतींनी अधिवेशन तात्पुरते तहकूब केले.
यापूर्वीही केलेला हाका डान्स
माओरी खासदार हाना राविती करियारिकी मापी क्लार्क या हाका डान्समुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने निवडणूक जिंकल्यानंतर संसदेतील पहिल्या भाषणात हा डान्स केला होता. तिचा तो व्हिडिओही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.
हाका नृत्य काय आहे?
हाका हे सामान्य नृत्य नाही. हे एक प्राचीन युद्ध नृत्य आहे, जे माओरी जमातीचे लोक पूर्ण ताकदीने सादर करतात. हे नृत्य माओरी जमातीच्या अभिमानास्पद इतिहासाचे, सामर्थ्याचे आणि एकतेचे ज्वलंत प्रदर्शन आहे.