शोकांतिका! अफगाणिस्तानचा ६ अब्ज डॉलर्सचा खजिना सांभाळणाऱ्या मंत्र्यावर कॅब चालविण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 06:19 AM2022-03-21T06:19:29+5:302022-03-21T06:20:28+5:30
दाेन दिवसांत ५० ट्रिप्स पूर्ण केल्यावर ९५ डाॅलर्स एवढा बाेनस मिळेल. घरात पत्नी आणि ४ मुले आहेत. कसेतरी भागत आहे, अशी विदारक परिस्थिती त्या मंत्र्यांनी कथन केलीय.
वाॅशिंग्टन : गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने पुन्हा अफगाणितस्तानचा ताबा घेतला. त्यानंतर लाेकशाही मार्गाने निवडून आलेल्या राज्यकर्त्यांना देश साेडावा लागला. देशाबाहेर पडून निर्वासितांसारखे जगण्याची वेळी त्यांच्यावर आली आहे. एकेकाळी अफगाणिस्तानचा खजिना सांभाळणारे अर्थमंत्री खालीद पाएंदा यांच्यावर कॅब चालवून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. अमेरिकेची राजधानी वाॅशिंग्टन डीसीमध्ये ते कॅब चालविताना दिसतात.
अमेरिकेचे सैन्य बाहेर पडू लागताच तालिबानने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानचा पुन्हा ताबा घेतला. त्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी व त्यांचे इतर मंत्री जनतेला वाऱ्यावर साेडून देशाबाहेर गेले. खालिद यांचाही त्यात समावेश हाेता. अनेक मंत्र्यांनी अमेरिकेत आश्रय घेतला. मात्र, खालिद यांची परिस्थिती त्यांच्यासारखी नाही. एकेकाळी सहा अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीची ज्यांच्या हातात चावी हाेती, त्या खालिद यांच्यावर पाेट भरण्यासाठी कॅब चालविण्याची वेळ आली आहे. खालिद म्हणाले की, संपूर्ण आयुष्य अफगाणिस्तानात घालविले. आता अमेरिकेत आहे.
लेबनानच्या एका कंपनीचे पेमेंट न आल्यामुळे अशरफ घनी यांनी मला चांगलेच सुनावले हाेते. तालिबानने ताबा घेण्यापूर्वी मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला हाेता. १५ ऑगस्ट २०२१ पूर्वीच मी अमेरिेकेत पाेहाेचलाे हाेते. जगाने आम्हाला २० वर्षांमध्ये बरीच मदत केली. मात्र, आम्ही कमनशिबी ठरलाे, असे खालिद यांनी सांगितले.
काय म्हणाले माजी मंत्री...
मला दाेन दिवसांमध्ये ५० ट्रिप्स पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यानंतर मला ९५ डाॅलर्स एवढा बाेनस मिळेल. घरात पत्नी आणि चार मुले आहेत. काही बचत हाेती. त्याआधारे कसेतरी भागत आहे, असे खालिद यांनी सांगितले.