रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे ही जगातील सर्वात लांब रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 04:06 AM2017-11-21T04:06:10+5:302017-11-21T04:07:01+5:30
रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे ही जगातील सर्वात लांब रेल्वे म्हणून ओळखली जाते. मॉस्को ते व्लादिवोस्तोक असा हा मार्ग तब्बल ९२८९ किलोमीटरचा म्हणजेच ५७७२ मैल लांब आहे.
रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे ही जगातील सर्वात लांब रेल्वे म्हणून ओळखली जाते. मॉस्को ते व्लादिवोस्तोक असा हा मार्ग तब्बल ९२८९ किलोमीटरचा म्हणजेच ५७७२ मैल लांब आहे. हा प्रवास सात दिवसांचा म्हणजे १५२ तासांचा आहे. त्या रेल्वेचं काम १९ व्या शतकात सुरू झालं होतं आणि त्या रेल्वेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी तेव्हा विशेष मंत्र्याची नेमणूक करण्यात आली होती. पहिल्या आणि दुसºया महायुद्धाच्या काळात या रेल्वेचा प्रचंड उपयोग झाला. आता त्या रेल्वेने खूप कमी स्थानिक लोक प्रवासी करतात. पण पर्यटकांना मात्र ही रेल्वे आजही भुरळ घालते. दरवर्षी या मार्गावरून तब्बल २ लाख कन्टेनर्स ये-जा करतात. आपल्याला अनेक देशांविषयी फारशी माहितीही नसते. त्यातही आपण अमेरिकेबद्दल जितकी माहिती करून घेतो वा ती आपल्याला मिळते, तितकी रशियाविषयी मात्र नसते. अनेक काळपर्यंत तेथील माहिती मिळतही नसे. कम्युनिस्ट राजवट असलेल्या आणि पोलादी पडद्यात सारे काही जणू लपून ठेवल्याप्रमाणे असलेल्या या देशाची माहिती सहजपणे मिळतही नसे. पण रशिया हा एकमेव देश आहे की ज्याच्या सीमा तब्बल १४ देशांशी जोडल्या गेल्या आहेत. नॉर्वे, लाटविया, अॅस्टोनिया, लिथवेनिया, चीन बेलारुस, अझरबैजान, पोलंड, मंगोलिया, उत्तर कोरिया, कजाकिस्तान, यूक्रेन, जॉर्जिया, फिनलँड हे ते देश आहेत.
रशियाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगातील ज्या सर्वात मोठ्या १0 नद्या आहेत, त्यापैकी चार एकट्या रशियात आहेत. जगातील एकूण जंगलांचा २0 टक्के म्हणजे एक पंचमांश भाग रशियामध्ये आहे. अमेरिकेच्या दुप्पट आकाराच्या या देशात एकूण ११ टाइम झोन आहेत. म्हणजे ११ ठिकाणी वेगवेगळी वेळ असते. अमेरिकेमध्ये त्या सहा आहेत.